भाविकांकडून विसर्जनासाठी दान घेतलेल्या गणेशमूर्ती पुन्हा विकण्याचे षडयंत्र !

विशेष  प्रतिनिधी

पुणे : गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सव आला की, पुणे महानगरपालिका पर्यावरण रक्षणाच्या गोंडस नावाखाली सातत्याने काही ना काही धर्मद्रोही उपक्रम राबवत आहे. विसर्जनासाठी ‘कृत्रिम हौद’ या धर्मविरोधी संकल्पनेनंतर ‘अमोनियम बायकार्बोनेट’च्या केमिकलमध्ये विसर्जन आरंभले. यंदाच्या वर्षी कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर कृत्रिम हौद कचरापेट्यांपासून बनवल्याचे उघड झाले.

संबंधित कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकून पालिकेने हे मान्य केले. आता तर पालिकेने धर्मद्रोहाची परिसीमा गाठत ‘मूर्तीदान’ उपक्रमाअंतर्गत भाविकांकडून विसर्जनासाठी दान घेतलेल्या मूर्तींची पुनर्विक्री करण्यासाठी अनुमती देत सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मूर्तींची मोठ्या प्रमाणात विक्री केली जात असल्याचा आरोप हिंदू जनजागृती समितीने केला आहे.

किती मूर्ती दान मिळाल्या, किती मूर्ती विकल्या, त्यातून मिळालेला पैसा कुठे आणि कोण वापरणार, या सर्व गोष्टी पालिकेच्या आवाहनावर विश्‍वास ठेवून त्यांना विसर्जनासाठी मूर्तीदान करणार्‍या भाविकांपासून का लपवल्या, असा प्रश्‍नही समितीने उपस्थित केला आहे. हा गणेशभक्तांच्या धार्मिक भावनांशी खेळ करणारा, भाविकांची आणि मूर्तीकारांची घोर फसवणूक करणारा ‘मूर्तीदान घोटाळा’च आहे, असाही आरोप यावेळी करण्यात आला.

हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत हा आरोप केला. यावेळी त्यांनी पालिका प्रशासनाचा पत्रव्यवहार, मूर्तिदान घेणार्‍या ‘स्प्लेंडीड व्हिजन’ या गैरसरकारी संस्थेच्या पदाधिकार्‍यांचे ‘स्टिंग’ व्हीडीओही पत्रकार परिषदेत सादर केले. गणेश मूर्तीकार संघटनेचे अध्यक्ष प्रवीण बावधनकर, केशव कुंभार, ‘गार्गी फाऊंडेशन’चे विजय गावडे, ‘राष्ट्र निर्माण’ संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र युवा संपर्क प्रभारी दयावान कुमावत आणि समितीचे मिलिंद धर्माधिकारी यावेळी उपस्थित होते.

एकीकडे पालिकेने नदीपात्रात विसर्जन करण्यास जबरदस्तीने बंदी लादली आहे. दुसरीकडे याचा गैरफायदा घेत मोठ्या प्रमाणात मूर्तीदान घेऊन सामाजिक संस्थांकरवी अवैधपणे त्याच्या विक्रीचा घाट घातला आहे. पालिका प्रशासन आणि सामाजिक संस्था यांना अशा प्रकारे विसर्जनासाठी दान घेतलेल्या मूर्ती परस्पर विकण्याचा अधिकार आहे का ?, या विक्रीत पालिकेच्या अधिकार्‍यांचे किती ‘परसेंट’ ठरले आहेत ?,

विसर्जनासाठी दान केलेल्या मूर्ती विकून पुढील वर्षी पुन्हा त्यांची प्रतिष्ठापना करता येते का, तसेच हे धर्मशास्त्रदृष्ट्या योग्य आहे का ?, पालिकेला हिंदूंच्या धार्मिक कृतींमध्ये ढवळाढवळ करण्याचा आणि गणरायाला विकण्याचा अधिकार कोणी दिला, असे प्रश्‍न उपस्थित करत ‘या सर्व प्रश्‍नांची उत्तरे पालिका प्रशासनाने आम्हाला द्यायलाच हवीत’, अशी मागणीही घनवट यांनी या वेळी केली.

महापालिकेने मूर्तीकारांच्या पोटावरच पाय दिला आहे ! – प्रवीण बावधनकर

या वेळी पुण्यातील गणेश मूर्तीकार संघटनेचे अध्यक्ष बावधनकर यांनी सांगितले की, एकीकडे ‘पीओपी’च्या मूर्तीमुळे प्रदूषण होते, असे पालिका सांगते आणि दुसरीकडे ‘पीओपी’च्या मूर्ती पुनर्विक्रीसाठी पालिका साहाय्य करते, हा पालिकेचा दुटप्पीपणा आहे. मूर्तीकारांनी श्रमपूर्वक बनवलेल्या मूर्ती कवडीमोल भावात विकून पालिकेने आम्हा मूर्तीकारांच्या पोटावरच पाय दिला आहे.

या दान घेतलेल्या मूर्ती पुन्हा विकून पैसे गोळा करण्याच्या पालिका आणि सामाजिक संस्था यांच्या घोटाळ्याचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि नागरिकांना आवाहन करतो की, आपली फसवणूक करणार्‍या पालिका प्रशासनाकडे कोणीही ‘मूर्तीदान’ करू नये; तसेच समस्त मूर्तीकारांनीही पालिकेच्या या भूमिकेचा संघटितपणे निषेध करावा, असे आवाहनही बावधनकर यांनी या वेळी केले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*