भारत-चीन सीमेवर मोठा तणाव; लष्करप्रमुख लडाखमध्ये दाखल

  • दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने; फ्रंटल पोस्टलाही जनरल नरवणे भेट देणार

वृत्तसंस्था

लेह : पूर्व लडाखमधील पँगाँग टीएसओ सरोवर परिसरात प्रचंड तणावाची स्थिती आहे. दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने आहे. या भागातील नाजूक स्थिती लक्षात घेता, परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे आज सकाळी लडाखमध्ये दाखल झाले.

दोन दिवसांच्या या भेटीत जनरल नरवणे सैन्य दलाच्या तयारीचा आढावा घेतील. काही फ्रंटल पोस्टलाही भेटी देऊन जवानांचे मनोधैर्य वाढवतील.

पँगाँग सरोवरच्या दक्षिण किनाऱ्यावर सर्वाधिक तणाव आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने २९-३० ऑगस्टच्या रात्री अचानक या भागात घुसखोरी करून एकतर्फी नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न केला. पण सतर्क असलेल्या भारतीय सैन्याने त्यांचा डाव उधळून लावला.

त्याचवेळी भारताच्या स्पेशल फ्रंटियर फोर्सने म्हणजेच SFFने दक्षिण किनाऱ्याजवळच्या महत्त्वाच्या टेकडया ताब्यात घेतल्या. त्यामुळे रणनितीच्या दृष्टीने महत्त्वाची ठिकाणांवर भारताचे नियंत्रण आहे. फक्त २९-३० ऑगस्टच्या रात्रीच नव्हे, त्यानंतरही चीनने घुसखोरीचे प्रयत्न केले. पण भारतीय सैन्याने प्रत्येकवेळी त्यांचा डाव हाणून पाडला.

मागच्या तीन दिवसांपासून दोन्ही देशांच्या वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांध्ये चर्चा सुरु आहेत. पण या सर्व चर्चा आतापर्यंत निष्फळ ठरल्या आहेत. चीन पँगाँग टीएसओ भागातून मागे हटायला तयार नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. चिनी सैन्य फिंगर आठपर्यंत असते. पण एप्रिलमध्ये ते फिंगर फोरपर्यंत आले. त्यांनी पूर्वी होते त्याच ठिकाणी फिंगर आठ पर्यंत माघारी फिरावे,अशी भारताची मागणी आहे.

गलवान खोऱ्यातील रक्तरंजित संघर्षानंतर चिनी सैन्य काही भागातून मागे फिरले. पण पँगाँग टीएसओ परिसर त्यांनी सोडला नव्हता. त्यामुळे या भागात पुन्हा तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला होता. आता तीच स्थिती निर्माण झाली आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*