भारतातील कालबाह्य नियमांचा फायदा चीनी कंपन्यांनी उपटला; आता नियम बदलणार : नितीन गडकरी

  • चीनच्या कोंडीसाठी सरकारच्या निर्णयांचे समर्थन

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : “देशात असे अनेक कालबाह्य नियम आहेत आणि त्यामुळे चीनी कंपन्या त्याचा फायदा उपटत होत्या. पण आता राष्ट्रीय हित आणि भारतीय कंपन्यांच्या हितासाठी त्या नियमांचे पुनरावलोकन करून नियम बदलणार, ” असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले. एनडीटीव्हीच्या मुलाखतीत त्यांनी अनेक विषयांवर परखड मते व्यक्त केली.

चीनची कोंडी करण्यासाठी मोदी सरकारने घेतलेल्या कठोर निर्णयांचे समर्थन त्यांनी केले. काही दिवसांपूर्वी ताबारेषेवर झालेल्या भारत आणि चीनच्या जवानांच्या चकमकीत २० भारतीय जवानांना हौतात्म्य आले होते. त्यानंतर देशभरातून चीनचा विरोध वाढू लागला होता. तसेच सरकारनेदेखील चीनच्या विरोधात कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला.

गडकरी म्हणाले, “यापुढे चिनी कंपन्यांना महामार्गाच्या प्रकल्पात सहभागी करून घेतले जाणार नाही. याव्यतिरिक्त त्यांना संयुक्त उपक्रमांमध्येही सहभागी केले जाणार नाही. तसंच ज्या कंपन्यांना चीनकडून वीज पुरवठा करणारी उपकरणं किंवा अन्य वस्तूंची आयात करावी लागणार आहे त्यांना सरकारची परवानगी घ्यावी लागेल असे ऊर्जा मंत्रालयाने जाहीर केले आहे. यातून चीनने वेळीच धडा शिकला पाहिजे.”

“आपले अनेक नियम कालबाह्य झाले आहेत. त्या नियमांनी कंत्राटदारांना कडक अटी घालून दिल्या. उदाहरणार्थ मोठे महामार्ग व पुलांच्या उभारणीसाठी ज्या कंत्राटदारांना अनुभव आहे अशाच कंत्राटदारांना परवानगी देण्यात येत होती. त्यामुळे आपल्या देशातील कोणत्याही कंपन्यांना कामे देता येत नव्हती. याचा फायदा चीनी कंपन्या उचलत भारतात काम मिळवत होत्या,” या महत्त्वाच्या मुद्द्याकडे गडकरी यांनी लक्ष वेधले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*