भाजप अडचणीत आला की पवार मदतीला कसे धावतात?

  • काँग्रेस नेते, कार्यकर्त्यांच्या मनातला प्रश्न बाळासाहेब थोरातांनी विचारला

विशेष प्रतिनिधी

मुंबई : भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सुनावल्याने काँग्रेसमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजप अडचणीत आला की शरद पवार मदतीला कसे काय धावून जातात, असा प्रश्न काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांपासून ते सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत अनेकजण विचारत आहेत. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांनी मनातला प्रश्न विचारून टाकला.

थोरात म्हणाले, “चीनच्या प्रश्नावर काँग्रेस पक्ष सरकारसोबत आहे. मात्र त्याचा अर्थ राष्ट्रहिताचे मुद्दे मांडू नये, असा होत नाही.
देशाच्या सीमा सुरक्षेबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला प्रश्न विचारणे हे राजकारण नाही तर जनतेने दिलेली जबाबदारी आहे. सन १९६२च्या आणि आजच्या परिस्थितीची तुलना होऊ शकत नाही हे लक्षात घ्यावे. गेल्या ४५ वर्षांत चीन सीमेवर आपला एकही जवान शहीद झाला नव्हता.”

गलवान खोऱ्यात चीनच्या आगळीकीमुळे आपले २० जवान शहीद झाले आहेत. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सीमेत कोणीही घुसले नाही म्हणत आहेत. त्यांच्या या विधानाचा आधार घेऊन चीन आपल्या शहीदांना घुसखोर ठरवत आहे. याचे दु:ख काँग्रेसप्रमाणेच शरद पवार यांनाही असेलच, असा टोला थोरातांनी लगावला. क
शरद पवार काय बोलले, त्याची पूर्ण स्पष्टता नाही, मात्र त्यांच्या एखाद्या विधानावरून माध्यमांनी निष्कर्षापर्यंत पोहोचून पंतप्रधानांना क्लीन चिट आणि राहुल गांधी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह लावण्याचा आततायीपणा करू नये, असे थोरात यांनी स्पष्ट केले.

काँग्रेस प्रश्न विचारणारच

राहुल गांधी हे जनतेच्या मनातील प्रश्न सरकारला विचारत आहेत. राहुल गांधी यांची चिंता ही देशाच्या अखंडतेशी संबंधित आहे. ‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधानांनी चीनच्या आगळीकीबद्दल चकार शब्दही काढला नाही, असा दावा करून राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष प्रश्न विचारणारच, असे थोरात म्हणाले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*