बिहार निवडणुकीची सूत्रे देवेंद्र फडणवीस यांच्या हाती?

माजी मु्ख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बिहार निवडणुकीची सूत्रे देण्यात येणार आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. या बाबतची अधिकृत घोषणा अद्याप झाली नसली तरी पक्षातर्फे फडणवीस यांना तसे कळविण्यात आले आहे.


विशेष प्रतिनिधी 

मुंबई : माजी मु्ख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बिहार निवडणुकीची सूत्रे देण्यात येणार आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. या बाबतची अधिकृत घोषणा अद्याप झाली नसली तरी पक्षातर्फे फडणवीस यांना तसे कळविण्यात आले आहे.

बिहारमध्ये या वर्षाअखेर निवडणूक होत आहे. जनता दलासोबत भाजपाची आघाडी आहे. या ठिकाणी जागावाटपाचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरविताना रस्सीेखेच होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा जदयू हा तिथे मोठा पक्ष आहे. अशावेळी २४३ जागांपैकी जास्तीतजास्त जागा भाजपकडे घेताना मुत्सदेगिरीचा कस लागणार आहे. जागा वाटपामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद होऊन दोन पक्षांमध्ये तणाव निर्माण होऊ नये याचीही काळजी घ्यावी लागणार आहे. फडणवीस यांची प्रतिमा संयमी नेता अशी आहे. त्यामुळे त्यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.

यापूर्वी विविध राज्यांच्या निवडणुकांमध्ये केंद्रीय गृह मंत्री अमित शहा हे स्वत: लक्ष घालत. मात्र, गृह मंत्रीपदाची जबाबदारी असल्याने भारतीय जनता पक्षाकडून योग्य नेत्याचा शोध घेतला जात होता. त्यामध्ये फडणवीस यांचे नाव समोर आले आहे. फडणवीस यांचे वैशिष्टय म्हणजे त्यांचे हिंदी आणि इंग्रजीवर चांगले प्रभुत्व आहे.

महाराष्ट्रात  विविध समाजघटकांना भाजपाकडे वळवून घेण्यात फडणवीस यांनी मोठी भूमिका बजावली होती. बिहारमध्ये तर जातीचे राजकारण आणखी टोकदार आहे. या परिस्थिीतीत जातीच्या राजकारणाच्या बाहेर येऊन विकासात्मक राजकारणावर भर देण्यासाठी फडणवीस दिशा देऊ शकतात. यानिमित्ताने राष्ट्रीय राजकारणात फडणवीस यांचा प्रवेश होत असला तरी ही जबाबदारी केवळ बिहार विधानसभा निवडणुकीपुरतीच आहे.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचे तीव्र पडसाद बिहारमध्ये उमटत आहेत. मुंबई पोलीस आणि बिहार पोलिसांमधील वादही या निमित्ताने समोर आला आहे. फडणवीस यांनी या सगळ्या प्रकरणात अत्यंत निस्पृह भूमिका घेऊन महाराष्ट्राच्या चुकाही दाखवून दिल्या. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सातत्याने प्रश्न विचारले. या पार्श्वभूमीवरही या नियुक्तीकडे पाहिले जात आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*