‘बारामती’पुढे लाळघोटेपणा करण्याच्या नादात राजू शेट्टींची संघावर टीका; भाजपने दिले खरमरीत उत्तर


विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : “संघ समाजासाठी काय काम करतो हे आधी पाहावे आणि आपण पराभूत झाल्यानंतर समाजासाठी काय केले याची माहितीही समाजाला द्यावी,” असे आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना देण्यात आले आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुंबईतील धारावी परिसरातील राष्ट्रीय संघ स्वयंसेवकांनी केलेल्या कामाची माहिती दिली. त्यावर
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राज्यभर काम करावे,” अशी उपहासात्मक टीका शेट्टी यांनी केली होती.

“चंद्रकांत पाटील यांनी दिलेली माहिती जनतेने नाकारलेल्या माजी खासदार राजू शेट्टी यांना का झोंबली,” असा संतप्त सवाल बुधवारी भाजपने केला. जिल्हा उपाध्यक्ष नाथाजी पाटील, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, उपाध्यक्ष बाजीराव देसाई या त्यासंबंधीचे पत्रक प्रसिध्दीस दिले आहे.

राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी शेट्टी यांनी ताळतंत्र सोडल्याचे सांगत शेट्टींवर टीका करण्यात आली आहे. “देशामध्ये ज्या-ज्यावेळी संकटे आली तेव्हा संघाचे स्वयंसेवक कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता झोकून देऊन काम करतात. संघ स्वयंसेवकांनी राज्यभर काम करावे, नागपूर मुख्यालयात काम करावे असे उपदेशाचे डोस पाजण्यापेक्षा आपण कोरोना महामारीच्या काळात काय काम केले हे एकदा स्पष्ट करावे.

शेतकऱ्यांचे नेतृत्व करण्याचे ढोंग करून त्यांना फसवत आलात व आता तर राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी बारामतीचे उंबरे झिजवायला लागलात यातूनच कर्तृत्वाची उंची दिसते,” असा टोला शेट्टी यांना लगावण्यात आला आहे.

“सत्तेतील पदाशिवाय तुम्ही जगू शकत नाही हेच त्यातून सिद्ध होते. ज्या महाविकास आघाडीचे गोडवे गाताना थकत नाही त्या आघाडीच्या मुख्यमंत्र्यांना सांगून वीज बिले माफ करावीत. प्रसिद्धीसाठी वीज बिलांची होळी करून हा प्रश्न सुटणार नाही.

सामान्य जनतेच्या अनेक प्रश्नाची उत्तरे प्रलंबित असताना व महाराष्ट्रातील सत्ताधीशांनी जनतेला वाऱ्यावर सोडले असताना फक्त स्वत:च्या आमदारकीसाठी आपण संघावर टीका करणे बंद करावेे,” असेही शेट्टी यांना सुनावण्यात आले आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था