प्रणवदा राजकीय अस्पृश्यतेचे विरोधी आणि संघाचे मार्गदर्शक; मोहन भागवतांची श्रद्धांजली

वृत्तसंस्था

नागपूर : प्रणवदा हे राजकीय अस्पृश्यतेचे विरोधी आणि संघाचे मार्गदर्शक होते, अशी श्रद्धांजली सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी वाहिली आहे.

प्रणव मुखर्जी यांच्या निधनानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कधीही न भरुन निघणारे नुकसान झालं आहे असं म्हटलं आहे. प्रणव मुखर्जींच्या निधनानंतर सरसंघचालक आणि सरचिटणीस सुरेश उर्फ भैय्याजी जोशी यांनी एक संयुक्त पत्रक जारी करत शोक व्यक्त केला आहे. मुखर्जी यांनी कायमच राष्ट्रीय हिताला प्राधान्य दिल्याचे सांगत ते आमच्यासाठी मार्गदर्शक होते तसेच त्यांना राजकीय अस्पृश्यता आवडत नव्हती असंही संघाने म्हटलं आहे.

प्रणव मुखर्जी यांना राजकीय अस्पृश्यता कधीच आवडली नाही. सर्व पक्षांकडून त्यांचा आदर केला जायचं असं या पत्रकामध्ये म्हटलं आहे. “ते संघासाठी मार्गदर्शक होते. संघटनेबद्दल त्यांना जिव्हाळा होता. त्यांच्या निधनामुळे संघाचे कधीही न भरुन निघाणारे नुकसान झालं आहे,” असं या पत्रकामध्ये म्हटलं आहे.

७ जून २०१८ रोजी नागपुरमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमासाठी मुखर्जी यांनी  हजेरी लावली होती. नागपुर विमानतळावर स्वयंसेवकांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं होतं. मुखर्जी हे या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी  होते. संघाच्या तृतीय वर्षाच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोपासाठी आयोजित काय कार्यक्रमात ते सहभागी झाले होते.

काय म्हणाले होते प्रणव मुखर्जी?

सुधैव कुटुंबकम् हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. भारताला पाच हजार वर्षांची संस्कृती आहे आणि विशेष बाब म्हणजे ही संस्कृती अद्यापही टिकून आहे ही बाब गौरवशाली आहे असे मत यावेळी मुखर्जी यांनी व्यक्त केले होते. एवढेच नाही तर प्रत्येकाने देशाबाबत निष्ठा बाळगणे हीच देशभक्ती आहे असेही त्यांनी म्हटले होते. या कार्यक्रमाआधी मुखर्जी यांनी नागपुरातील रेशीम बाग स्मृती मंदिराला भेट दिली. या ठिकाणी सरसंघचालक मोहन भागवत यांनी त्यांचे स्वागत केले होते. डॉ. हेडगेवार हे भारतमातेचे सुपुत्र आहेत आहेत अशी प्रशंसा मुखर्जी यांनी केली होती. तसेच आपल्या भाषणात त्यांनी भारतीय संस्कृतीचे आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्यांचे गुणगान गायले.

प्रणव मुखर्जी यांनी सम्राट अशोक, सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांच्यापासून महात्मा गांधी, पंडित नेहरू यांच्यापर्यंतचे दाखले त्यांनी दिले. जनतेच्या आनंदातच राजाचा आनंद असायला हवा असे मत यावेळी प्रणवदांनी व्यक्त केले होते. विविधता ही भारताची शक्ती आहे कारण देशात विविधता असूनही आपण सगळे भारतीय आहोत ही बाब आपल्याला एकमेकांशी जोडून ठेवते असेही प्रणवदांनी म्हटले होते.

राष्ट्रवादाबाबत आपले मत व्यक्त करताना प्रणवदांनी, “राष्ट्रवाद हा कोणत्याही भाषा, रंग, जात, धर्माशी संबंधित नसतो. तसेच असहिष्णुतेमुळे देशाची ओळख धूसर होऊ लागते. देशाप्रति प्रत्येकाने सच्ची निष्ठा बाळगणे हीच खरी देशभक्ती आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यात अनेकांचे योगदान होते. त्यानंतर १९५० मध्ये राज्यघटना तयार झाली. या संविधानामुळे राष्ट्रीय भावना दृढ होते. विविधता आणि त्यातील एकता हेच आपल्या देशाचे सौंदर्य आहे,” असं मत व्यक्त केलं होतं.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*