पार्थला आजोळकडून समर्थन; पद्मसिंह पाटलांचे नातू सरसावले

  • पार्थ, तुम्ही जन्मजात फायटर; मल्हार पाटलांची पोस्ट

विशेष प्रतिनिधी

उस्मानाबाद : शरद पवार यांनी जाहीररित्या फटकारल्यानंतर पार्थ पवार यांनी प्रतिक्रिया नाकारली आणि अजित पवार यांनीही मौन बाळगले तरी पार्थ पवारांना आजोळचे समर्थन मिळाले आहे.

“पार्थ पवार यांचं वक्तव्य इमॅच्युर असून त्यांच्या बोलण्याला कवडीची किंमत आम्ही देत नाही “, अशा शब्दांत शरद पवार यांनी फटकारल्यानंतर, आता पार्थ तुम्ही जन्मजात फायटर आहात, अशी पोस्ट भाजपचे नेते पद्मसिंह पाटील यांचे नातू मल्हार पाटील यांनी फेसबुकवर केली आहे.

पार्थ पवार यांच्या मातोश्री सुनेत्रा पवार या पद्मसिंह पाटील यांच्या बहीण आहेत. अजित पवार आणि डॉ. पद्मसिंह पाटील हे नात्याने मेव्हणे आहेत. मल्हार पाटील हे तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजित सिंह यांचे चिरंजीव आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे पार्थ पवारांचे आजोळ आहे.

मल्हार पाटील यांनी फेसबुकवर लिहिलं आहे की, “तुम्ही जन्मजात फायटर आहात आणि मी ते लहानपणापासून पाहिलं आहे. मला तुमचा अभिमान आहे. आपण उस्मानाबादचे आहोत आणि लढायचं कसं हे आपल्याला माहित आहे.”

शरद पवार काय म्हणाले होते?

पार्थ पवार यांनी काही दिवसांपूर्वीच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी केली होती. तशा आशयाचं पत्र त्यांनी गृहमंत्र्यांना दिलं होतं. यावर शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्याबाबत कठोर भूमिका घेतली. याविषयी शरद पवार म्हणाले की, “नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत आम्ही देत नाही. त्यांचं वक्तव्य इमॅच्युअर आहे. परंतु सीबीआय चौकशी जर कोणाला करायची असेल, मी स्पष्ट सांगितलं की माझा महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर 100 टक्के विश्वास आहे. पण कोणाला असं वाटत असेल की सीबीआय चौकशीची मागणी करावी, तर त्यालाही कोणी विरोध करायचं कारण नाही.”

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*