कोकण, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेविरुध्द पंगा घेतलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने पश्चिम महाराष्ट्रात कॉंग्रेसला ठेंगा दाखविण्यास सुरूवात केली आहे. सांगली बाजार समितीच्या संचालक मंडळाची पाच वर्षांची मुदत संपल्याने बाजार समितीवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली. सांगली जिल्ह्यावर राजकीय वर्चस्व कोणाचे हा परंपरागत राजकीय वाद यामागे उफाळून आला आहे. वसंतदादा पाटील यांच्यानंतर पतंगराव कदम आणि जयंत पाटील यांच्यात या बाबतीत नेहमीच चुरस राहिली. त्यात पतंगराव कदम पाटील यांना जड जात. मात्र तुलनेने नवखे असलेल्या विश्वजित कदम यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न यावेळी जयंत पाटील यांनी केला आहे.
विशेष प्रतिनिधी
सांगली : कोकण, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेविरुध्द पंगा घेतलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने पश्चिम महाराष्ट्रात कॉंग्रेसला ठेंगा दाखविण्यास सुरूवात केली आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची पाच वर्षांची मुदत संपल्याने बाजार समितीवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली.
संचालक मंडळास मुदतवाढ मिळावी यासाठी सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम आणि आमदार विक्रम सावंत प्रयत्नशील होते. मात्र, पालकमंत्री जयंत पाटील यांनी अखेर प्रशासकाची नियुक्ती करून महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेससह विद्यमान संचालकांना दणका दिला.
सांगली बाजार समितीच्या २०१५ च्या निवडणुकीत कॉंग्रेसने राष्ट्रवादीचा दारुण पराभव केला होता. सतरापैकी १४ जागांवर विजय मिळविला होता. पतंगराव कदम, माजी मंत्री अजितराव घोरपडे, आमदार विक्रम सावंत यांच्या पॅनेलविरोधात पालकमंत्री जयंत पाटील, माजी आमदार विलासराव जगताप आणि स्वर्गीय माजी मंत्री मदन पाटील यांच्या पॅनेलमध्ये लढत झाली होती. तेव्हापासूनच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अस्वस्थ होते. संचालक मंडळाची २६ ऑगष्ट रोजी पाच वर्षांची मुदत संपली. त्यामुळे ही संधी जयंत पाटील यांंनी साधली.
वास्तविक त्यांच्याच मंत्रीमंडळातील एक सहकारी विश्वजित कदम
बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळास मुदतवाढ मिळवण्यासाठी प्रयत्नशिल होते. विशेष म्हणजे कदम हे सहकार राज्यमंत्रीही आहेत. पण, पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोना झाल्याने त्यांचा पदभार आल्याची संधी साधून जयंत पाटील यांनी तातडीने प्रशासक नियुक्तीच्या हालचाली सुरू केल्या. सहकार राज्यमंत्री डॉ. कदम यांनी बुधवारी रात्री काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह पालकमंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी सहभागी असल्यामुळे दोन्ही पक्षांच्या नेत्यांना विश्वासात घेऊनच प्रशासक नियुक्तीचा निर्णय व्हावा, अशी विनंती केली होती. मात्र, पालकमंत्री पाटील यांनी प्रशासक नियुक्तीचा निर्णय कायम ठेवला.