पवारांची दुखती नस मोदींनी दाबली; सहकारी बँकांवर रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण आणताच पवार चिडले

विशेष प्रतिनिधी

मुंबई/ सातारा : “शिष्यवर” पंतप्रधान नरेंद्र मोदींना “गुरू” शरद पवारांनी अनेक पत्ररूपी सल्ले देऊन झाल्यावर ते त्यानुसार वागत नाहीत म्हणून आता पवार चिडले आहेत. संपूर्ण देशातील सहकारी बँकांमधील ठेवींसंदर्भात मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयावर शरद पवारांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. साताऱ्यात आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मोदींच्या निर्णयाच्या विरोधात भाष्य केले. सहकारी बँका संपवण्याच्या दृष्टीने मोदी सरकारची वाटचाल सुरू असल्याची टीका त्यांनी केली.

या पूर्वी, स्थलांतरित मजुरांना परत आणण्यासाठी सरकारने धोरण आखावे, शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी पँकेज जाहीर करावीत, उस उत्पादक, साखर कारखान्यांसाठी पँकेज द्यावे, बिल्डर कम्युनिटी, रिअल इस्टेट क्षेत्राला सवलती देऊन आर्थिक मदत करावी, अशा सूचना देणारी “सूचक पत्रे” शरद पवारांनी मोदींना पाठविली होती. त्यांचे पुढे काय झाले? हे समजायला मार्ग नाही.

त्याखेरीज, IFSC सेंटर मुंबईतच ठेवा, अन्यथा देशाचे आर्थिक नुकसान होईल, असे अभ्यासपूर्ण पत्रही शरद पवारांनी मोदींना पाठवले होते.

सहकारी बँकांवर रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण आणताना मोदी सरकारने सहकारी बँकांमधील सर्वसामान्यांच्या ठेवींना संरक्षण दिले आहे. त्यांच्या ठेवींना परताव्याची विशिष्ट हमी दिली आहे. ती आधी नव्हती.
परंतु, आता याच बँकांतील ठेवीसंदर्भात मोदी सरकारने घेतलेल्या याच निर्णयावर पवारांनी आक्षेप नोंदवला आहे.

केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारीत सहकारी बँकांचे नियंत्रण दिल्याने सहकारी बँका संपवण्याकडेच केंद्र सरकार वाटचाल करत असल्याचे दिसते आहे असे ट्विटही त्यांनी केले आहे. पण मोदी सरकारला सहकारी बँकांचे नियंत्रण रिझर्व्ह बँकेकडे का द्यावे लागले?, सहकारी बँकांचे व्यवहार, गैरव्यवहार, गफले, घोटाळे, कर्जबुडवी प्रवृत्ती, इकडचे फंड तिकडे वळविणे या महत्त्वाच्या मुद्द्यांवर वर पवारांनी पत्रकार परिषदेत अथवा ट्विटमध्ये चकार शब्द काढलेला नाही.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*