पंतप्रधान गरिब कल्याण पॅकेजचा लाभ घेतला ४२ कोटी नागरिकांना

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोना संकट काळात देशातील गरिबांना दिलासा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ लाख ७० हजार कोटी रुपयांच्या पंतप्रधान गरिब कल्याण पॅकेजची घोषणा केली आहे. केंद्र सरकारतर्फे पॅकेजच्या आजपर्यंतच्या प्रगतीचा आढावा देण्यात आला आहे.

पंतप्रधान गरिब कल्याण पॅकेजअंतर्गत आतापर्यंत ४२ कोटी गरिबांना ६८ हजार ८२० कोटी रुपयांची मदत पोहोचविण्यात आली आहे. यामध्ये विनामूल्य अन्नधान्य, शेतकरी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना थेट आर्थिक मदत याचा समावेश आहे.

पंतप्रधान गरिब कल्याण अन्न योजनेमार्फत ७ सप्टेंबरपर्यंत ३.८४ कोटी लाभार्थ्यांना १.९१ एलएमटी धान्य (तांदुळ अथवा गहू) वितरित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे एप्रिल ते जून कालावधीत १८.८ कोटी लाभार्थ्यांना ५.४३ एलएमटी चणा वितरित करण्यात आला आहे. सदर योजनादेखील नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार असून जुलै महिन्यात १०.३ कोटी लाभार्थ्यांना १.०३ एलएमटी, ऑगस्टमध्ये २.३ कोटी लाभार्थ्यांना २३,२८८ एलएमटी आणि ७ सप्टेंबरपर्यंत ०.१५ कोटी लाभार्थ्यांना १४७४ एलएमटी चणा वितरित करण्यात आला आहे.

पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत ऑगस्ट महिन्यात ०.८९ कोटी तर सप्टेंबरमध्ये ०.१५ कोटी गॅस सिलिंडर वाटप झाले आहे. कर्मचारी निर्वाह निधीची (ईपीएफओ) रक्कम ऑनलाईन पद्धतीने काढण्याच्या योजनेचा लाभ ३६.०५ लाभ सदस्यांनी घेतला असून त्यांनी ९ हजार ५४३ कोटी रुपये काढले आहेत. त्याचप्रमाणे २४ टक्के ईपीएफ अंशदान योजनेंतर्गत ०.४३ कोटी लोकांना २ हजार ४७६ कोटी रुपयांचा लाभ झाला आहे.

केंद्रीय अर्थमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पीएम – किसान योजनेंतर्गत ८.९४ कोटी शेतकऱ्यांना १७ हजार ८९१ कोटी रुपयांचा पहिला हप्ता जारी करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे २०.६२ कोटी म्हणजे १०० टक्के महिला जनधन बँक खात्यांमध्ये १० हजार ३१२ कोटी रुपयांचा तिसरा हप्ता जमा करण्यात आला आहे. तसेच वृद्ध, विधवा आणि दिव्यांग व्यक्तींना दोन हप्त्यांमध्ये २ हजार ८१४.५ कोटी रुपये त्यांच्या बँक खात्यांमध्ये पाठविण्यात आले आहेत. बांधकाम कामगारांना ४ हजार ९८७.१८ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*