पंतप्रधानांनी घेतला लशीच्या प्रगतीचा आढावा

कोरोना प्रतिबंधक लशींच्या संशोधनाची प्रगती आणि संभाव्य लशींच्या वितरण व लसीकरणाची तयारी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी आढावा घेतला. देशभर लशींच्या वाटपात सूत्रीकरण ठेवण्यासाठी तज्ज्ञांच्या समित्या आराखडा तयार करत असून त्याची माहिती मोदींनी बैठकीत घेतली.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोना प्रतिबंधक लशींच्या संशोधनाची प्रगती आणि संभाव्य लशींच्या वितरण व लसीकरणाची तयारी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी आढावा घेतला. देशभर लशींच्या वाटपात सूत्रीकरण ठेवण्यासाठी तज्ज्ञांच्या समित्या आराखडा तयार करत असून त्याची माहिती पंतप्रधानांनी घेतली.

या बैठकीला डॉ. हर्ष वर्धन यांच्यासह निती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल उपस्थित होते. लस विकसित करण्यासाठी आवश्यक सर्व मदत केंद्राकडून दिली जाईल, असेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले. लशींचे वितरण-वाटप आणि लसीकरण यांचे नियमन करणेही गरजेचे असेल. त्या दृष्टीने नियामक क्षेत्रातील सुधारणांकडेही लक्ष द्यावे लागेल अशीही सूचना मोदींनी केली. संभाव्य यशस्वी लसींची निर्मिती झाल्यानंतर लसखरेदीची प्रक्रिया हा सर्वाधिक महत्त्वाचा भाग असेल. त्या दृष्टीने कोणती तयारी केली जात आहे, याचीही माहिती पंतप्रधानांनी घेतली.

पुढील वर्षांच्या सुरुवातीला लस बाजारात उपलब्ध होऊ शकेल, असा अंदाज केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी व्यक्त केला होता. शिवाय, देशभर लशींचे वितरण कसे केले जाईल, कोल्ड स्टोरेजमध्ये त्यांच्या साठवणुकीची व्यवस्था कशी असेल, प्राधान्यक्रम काय असतील, यावर लक्ष केंद्रित केल्याचेही सांगितले होते. कोल्ड स्टोरेजमध्ये साठवणे महत्त्वाचे असून गावपातळीवर लस पोहोचवण्यासाठी अस्तित्वात असलेल्या कोल्ड स्टोरेजची माहिती घेतली जात आहे. त्यानंतर किती अतिरिक्त कोल्ड स्टोरेजची गरज लागेल हे निश्चित केले जाईल. या संपूर्ण प्रक्रियेची माहिती मोदींनी घेतली.

कोरोना अजून नियंत्रणात आलेला नसल्याने सीरो सर्वेक्षण व नमुना चाचण्यांची संख्या वाढवण्याची सूचनाही मोदींनी केली. निव्वळ भारतीयांसाठी नव्हे तर जगभर कोरोनाची चाचणी, लसीकरण आणि औषधोपचार किफायतशीर दरात लोकांना मिळाले पाहिजे. त्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजेत, असे मोदी म्हणाले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*