पँगाँग लेक परिसरात चिनी घुसखोरीचा प्रयत्न भारतीय सैनिकांनी उधळला

  • एकीकडे शांतीचर्चा, दुसरीकडे घुसखोरी; पँगाँल लेक परिसरात दोन्ही देशांचे सैनिक आमने – सामने

वृत्तसंस्था

लेह : एकीकडे तणाव निवळण्यासाठी भारताशी चर्चा करत असलेल्या चीनची हेकडी काही अजून गेलेली नाही. चिनी सैन्याने सीमेवरील कुरापती सुरूच ठेवल्या आहेत. पँगाँग लेक परिसरात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये पुन्हा एकदा झडप झाली. २९-३० ऑगस्टच्या रात्री दोन्ही देशाचे सैनिक आमने-सामने आले त्यावेळी भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याऱ्या चिनी सैन्याला भारतीय सैनिकांनी जोरदार प्रत्युत्तर देत पिटाळून लावले.

 

भारत आणि चीन सैन्यामध्ये झालेल्या बैठकांमध्ये काही मुद्द्यांवर सहमती झाली होती. त्यांचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न चीनकडून करण्यात आल्याची माहिती भारतीय सैन्याने दिली आहे. या माहितीनुसार, चीनच्या सैनिकांनी आधी ठरलेल्या एकमताचे उल्लंघन केले आणि पूर्व लडाखमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. पँगाँग लेक परिसरात दोन्ही देशाचे सैनिक २९, ३० ऑगस्टच्या रात्री आमने-सामने आले होते. पण भारतीय सैनिकांनी जोरदार प्रतिकार करत पँगोंग आणि त्सो लेक परिसरात चीनच्या सैनिकांना घुसखोरीपासून रोखले.

पँगाँग तलाव परिसरात दोन्ही सैन्यांमध्ये झटापट झाल्यानंतर चुशूलमध्ये ब्रिगेड कमांडर दर्जाच्या अधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे. भारतीय लष्कर शांतता राखण्यावर विश्वास ठेवते, पण आपल्या सीमेचे रक्षण करण्यास सक्षम असल्याची प्रतिक्रिया भारतीय प्रवक्त्याने व्यक्त केली आहे.

 

यापूर्वी १५ जूनला भारत आणि चीनच्या सैन्यात गलवान खोऱ्यात जोरदार झटापट झाली होती. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले होते. या झटापटीनंतर दोन्ही देशांमधील तणाव कमी व्हावा यासाठी चर्चा सुरू असतानाच आता पुन्हा एकदा दोन्ही देशांचे सैनिक भिडल्याची बातमी आली आहे. यामुळे सीमेवरील तणाव अजूनही कमी झालेला नसल्याचे स्पष्ट होत असून चिनी सैन्य पूर्व लडाखमधून मागे हटायला तयार नसल्याचेही समोर येत आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*