निसर्गासोबत विकासासाठी महिंद्रा-गडकरींचे अराजकीय ऐक्य…!!

  • नॉर्वेतील जंगल ब्रीजचा फोटो चर्चेत; आनंद महिंद्रांच्या विनंतीनंतर काही तासांतच नितीन गडकरींची सकारात्मक प्रतिक्रिया

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : नॉर्वेतील दोन जंगलांना जोडणारा इको फ्रेंडली पूल सोशल मीडियावर चर्चेत आला काय आणि त्याने दोन भारतीय दिग्गजांचे अराजकीय एेक्य घडवून आणले. आनंद महिंद्रा आणि नितीन गडकरी हे ते दोन दिग्गज. निसर्गासोबत विकासाच्या मुद्द्यावर हे अराजकीय ऐक्य घडले आहे.

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी नॉर्वेच्या राजदूतांनी केलेल्या एका ट्विटला रिट्विट करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना एक विनंती केली.

नोर्वेचे राजदूत एरिक सोल्हेम यांनी शनिवारी (दि. २९) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक फोटो टि्वट केला. ‘निसर्गासोबतच विकास शक्य आहे’, असं म्हणत त्यांनी नेदरलँड्सच्या ईकोडक्ट नावाच्या एका ब्रीजचा फोटो त्यांनी ट्विट केला. या ब्रीजची खासियत म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या जंगलाला हा ब्रीज जोडतो. यामुळे जंगली प्राणी आणि अन्य वन्यजीव आपला जीव धोक्यात न घालता ब्रीजवरून रस्ता पार करतात. विशेष म्हणजे हा ब्रीज नुसता काँक्रिटचा नाही, तर त्यावरही सर्वत्र हिरवळ पसरलेली फोटोमध्ये दिसत आहे.

आनंद महिंद्रांना हा फोटो इतका भावला की त्यांनी सोल्हेम यांचं ट्विट रिट्विट करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना विनंती केली. “नितीन गडकरीजी जर भारतातही विशिष्ट परिसरात महामार्ग बांधताना अशा प्रकराचं एखादं स्टँडर्ड फीचर दिलं तर आम्ही उभे राहून तुमच्यासाठी टाळ्या वाजवू”, असं आनंद महिंद्रा म्हणाले. महिंद्रांच्या या विनंतीवर काही तासांमध्येच नितीन गडकरींनीही प्रतिक्रिया दिली.

“आनंद महिंद्राजी आपण दिलेल्या सल्ल्याबद्दल खूप आभारी आहे. हो…. अशा प्रकारच्या नवनिर्मितीचीकडे आपलं लक्ष देण्याची गरज आहे…पर्यावरणीय समतोल राखलाच पाहिजे” असं गडकरी म्हणाले. यासोबतच दुसऱ्या एका ट्विटमध्ये “आम्ही एनएच-४४ वर सियोनी (मध्यप्रदेश) आणि नागपूरमध्ये एक ऍनिमल कॉरिडोर विकसित करण्याचा प्रयत्न केला आहे. याचे सकारात्मक परिणाम दिसले आहेत. भविष्यातही मनुष्य आणि प्राण्यांच्या शांततामय सहअस्तित्वासाठी प्रयत्न करत राहण्याची गरज आहे,’ असं गडकरी म्हणाले.

जंगलातून जाणाऱ्या हायवेमुळे अनेक जनावरांना भरधाव गाडीखाली आल्यामुळे जीव गमवावा लागतो. यावरचा उपाय म्हणून आनंद महिंद्रा यांनी नितीन गडकरींना सुचवलेली कल्पना नेटकऱ्यांनाही चांगली आवडली असून ते ट्विटवर विविध सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*