नवीन शैक्षणिक धोरणात केवळ विद्यार्थीच नाही तर शिक्षकांचेही ज्ञान अद्ययावत केले जाणार आहे. शिक्षकांसाठी चार वर्षांचा एकात्मिक बी.एड. अभ्यासक्रम असेल. यात प्रत्यक्ष शिकवण्याच्या अनुभवावर भर देण्यात आला आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाला चालना मिळेल, असा विश्वास केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : नवीन शैक्षणिक धोरणात केवळ विद्यार्थीच नाही तर शिक्षकांचेही ज्ञान अद्ययावत केले जाणार आहे. शिक्षकांसाठी चार वर्षांचा एकात्मिक बी.एड. अभ्यासक्रम असेल. यात प्रत्यक्ष शिकवण्याच्या अनुभवावर भर देण्यात आला आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाला चालना मिळेल, असा विश्वास केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.
मुंबई येथील पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या शतकमहोत्सवी वषार्तील शिक्षकदिन कृतज्ञता सोहळ्याप्रसंगी ‘नवीन शैक्षणिक धोरण’ या विषयावर जावडेकर यांनी संवाद साधला.
ते म्हणाले की, ३४ वर्षांनंतर बदलेल्या शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होऊन, संशोधन आणि विकासवृत्तीला चालना मिळेल. एकूण पटनोंदणीचे प्रमाण १० वर्षांमध्ये दुप्पटीने वाढेल. सध्या ५० लाख ते २ कोटी मुले शाळेबाहेर आहेत. त्यांना राष्ट्रीय मुक्त विद्यालय संस्था, खुल्या शाळांच्या माध्यमातून शिक्षण देण्यात येईल. आकडेमोड आणि लिहिणे-वाचणे याकडे लक्ष दिले जाईल. यामुळे सर्वांना शिकण्याची संधी मिळेल.
डॉ कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने प्रागतिक शैक्षणिक धोरण तयार केले आहे. यात ३-८ वर्षे वयोगटांतील बालकांसाठी कृतीतून शिक्षणावर भर दिला आहे. त्यांच्यातील उत्सुकता शोधून त्यांना संशोधनासाठी प्रोत्साहित केले जाईल. सध्या असलेल्या ३ हजार अटल टिंकरिंग लॅबच्या माध्यमातून शोधाला प्रोत्साहन देण्यात आले आहे.