द्राक्ष,कांद्या पाठोपाठ मका बनले नाशिक जिल्ह्याचे प्रमुख पिक

विशेष प्रतिनिधी 

नाशिक : नाशिक द्राक्ष,कांद्यांचा जिल्हा म्हणून देशभर परिचित आहे पण आता नाशिक जिल्हा मक्याचे सर्वाधिक पीक घेणारा जिल्हा म्हणूनही ओळखला जाऊ लागला आहे. यंदाच्या खरिपातील पाच लाख ६९ हजार हेक्टरवरील पेरणीपैकी तब्बल सव्वा दोन लाख हेक्टर क्षेत्र मक्यांच्या पिकाखाली गुंतविले आहे. कमी भांडवल, मर्यादित श्रम अन् अधिक उत्पन्न देणारे पीक म्हणून या पिवळ्या सोन्याला जिल्ह्यातील दहा तालुक्यांत सर्वाधिक पसंती मिळत आहे.

जिल्ह्यातील पीक पॅटर्न गेल्या दोन-तीन वर्षापासून बदलत आहे. यामध्ये मोटा बदल म्हणजे बाजरी,डाळी व तेलबियांचे क्षेत्र निम्म्याने घटले याची जागा मक्यासह कांदा व भाजीपाला पिकाने घेतली आहे. विशेषतः सर्वाधिक क्षेत्र मक्याखाली गुंतविले जात असून अत्यल्प खर्चात हे पीक निघत असल्याने शेतकऱ्यांना उत्तम पर्याय मिळाला आहे. प्रचंड प्रमाणात वाढलेल्या पोल्ट्री व स्टार्च उद्योगामुळे मक्यांच्या मागणीत वाढ झाली आहे. या दोन्ही उद्योगांसाठी सांगली,सातारा, शिरपूर, दोंडाईचा येथे मागणी आहेच. पण गुजरात,तामीळनाडू,हरियाना, पंजाब आदी राज्यात व युक्रेन,मलेशिया,व्हिएतनाम येथेही मोठ्या प्रमाणात मका निर्यात होतो. वाढलेल्या मागणीमुळे गेल्यावर्षी तर खासगी बाजारात दोन हजारांच्या आसपास दर पोचले होते, याशिवाय केंद्र शासनानेदेखील एक हजार ७६० रूपयांचा हमीभाव निश्चित केल्याने,मका पीक,परवडण रे म्हणून शेतकऱ्यांकडून पसंती मिळत आहे.

मक्याला सॉफ्ट कॉर्नर

खरिपाच्या सुरवातीला मका पीक घेऊन रब्बीतील गव्हासह उन्हाळ कांद्याचेही पीक घेता येते, बियाण्याच्या किंमती मर्यादित, फक्त दोन-तीन फवारण्या,मर्यादित खते,आंतरमशागतीसह यंत्रामुळे काढणीचा खर्चही अल्प,जनावरांना चारा,तसेच काढणी करतांना पूस असला तरी,बिट्या झाकून ठेवत केव्हाही मका तयार करून विक्री करता येते. शिवाय शासकीय हमीभावात विक्री केल्यास एक हजार ७६० रूपये दर निश्चितच असतो. यामुळेच मक्याला पसंती मिळत आहे. मक्याची सर्वाधिक लागवड येवला तालुक्यात झाली असून त्याखालोखाल मालेगाव,बागलाम व नांदगावमध्ये मक्याखाली क्षेत्र गुंतले आहे, तर नाशिक,दिंडोरी, निफाडमध्ये अपेक्षेपेक्षा लागवड घटल्याचा आकडे सांगतात.

अर्थशास्त्राकडे द्या लक्ष

मक्याचे पीक १२० दिवसात येते, जिल्ह्यातील जमिनीचा पोत बघता एकरी ३० ते ४० सरासरी ३३ क्विंटल उत्पन्न मक्याचे निघते, सासकीय हमीभाव एक हजार ७६० रूपये गृहीत धरल्यास सरासरी ५० ते ६० हजारांचे उत्पन्न एका एकरातून मिळते. यातील सुमारे २० ते २५ हजारांचा खर्च जातो,तर अंदाजे ३० ते ४० हजार रूपये शेतकऱ्यांच्या हातात राहतात.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*