देशात सलग तिसऱ्या दिवशी नोंदले गेले वीस हजारांहून जास्त कोरोना रुग्ण; महाराष्ट्राची स्थिती देशात सर्वात खराब

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली ः भारतातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. चिंतेची बाब म्हणजे शनिवारी एकाच दिवसात देशात 24 हजार 850 नवे कोरोनाबाधित आढळले. एकाच दिवसात आढळून आलेली ही कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या आहे. याच दिवशी देशात 613 कोरोना रुग्णांचा मृत्यूही झाला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी दिलेल्या आकडेवारीतून ही बाब स्पष्ट झाली.

देशात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची आजवरची एकूण संख्या आता 19 हजार 268 वर जाऊन पोचली आहे. तर देशातील अँक्टीव्ह कोरोना रुग्ण 24 लाख 44 हजार 814 इतके आहेत. उपचारानंतर पूर्ण बऱ्या झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 4 लाख 9 हजार 82 असून गेल्या चोवीस तासात कोरोनामुक्त होणारे 14 हजार 856 आहेत. कोरोनातून बऱ्या होणाचा देशाचा दर आता 60.76 टक्के आहे. शनिवारच्या तुलनेत तो किंचीत म्हणजे जेमतेम 0.4 टक्क्यांनी घटला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली.

देशात सलग तिसऱ्या दिवशी कोरोना बाधितांची संख्या वीस हजारांपेक्षा जास्त नोंदवली गेली. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त राज्य आहे. तर इतर तेरा राज्यांमध्ये कोरोना बाधितांची संख्या लक्षणीय आहे. महाराष्ट्रातल्या कोरोना बाधितांची संख्या आता दोन लाखांपेक्षा जास्त झाली आहे. महाराष्ट्रातले कोरोना मृत्यू 8 हजार 671 झाले आहेत. महाराष्ट्राच्या बाबतीतली गंभीर बाब म्हणजे या राज्यातील पहिल्या लाख रुग्णांची नोंद होण्यास 96 दिवस लागले. तर पुढचे एक लाख कोरोना बाधित फक्त 22 दिवसात आढळले.

महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले की, राज्याची आरोग्य यंत्रणा वाढत्या कोरोना बाधितांची काळजी घेण्यास सक्षम आहे. जुलै आणि ऑगस्ट हे दोन्ही महिने अत्यंत महत्वाचे असून त्यानंतर कोरोना बाधितांच्या संख्येत घट होण्याची सरकारला अपेक्षा आहे.

महाराष्ट्राप्रमाणेच तामिळनाडूतील कोरोना रुग्णांची संख्याही एक लाखाच्या पुढे गेली आहे. मात्र सतरा दिवसांच्या कडक लॉकडाऊननंतर राजधानी चेन्नईमध्ये शिथीलता आणण्याचा निर्णय तामिळनाडू सरकारने घेतला आहे. दिल्लीतल्या कोरोना रुग्णांची संख्या वेगाने एक लाखाच्या दिशेने वाढते आहे. आतापर्यंत देशाच्या या राजधानीतल्या कोरोना रुग्णांची संख्या 97 हजार 200 झाली असून कोरोना मृत्यू 3 हजार नोंदले गेले आहेत. आसाम या पूर्वेकडच्या लहान राज्यातले कोरोना रुग्णही आता अकरा हजारांपेक्षा जास्त झाले आहेत. शनिवारी एकाच दिवशी आसामात 1 हजार 202 रुग्ण नोंदले गेले.

कोरोना रुग्णांच्या संख्येत भारत जगात चौथ्या स्थानावर आहे. अमेरिका, ब्राझील आणि रशिया हे अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत. जगातल्या कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 12 लाख 40 हजार 943 एवढी प्रचंड झाली आहे. तर जगातल्या 5 लाख 30 हजार 137 लोकांनी कोरोनामुळे आतापर्यंत जीव गमावला आहे. अमेरिकेच्या जॉन हॉपकीन्स युनिव्हर्सिटीने ही आकडेवारी दिली आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*