दीड वर्षांनंतर उर्जित पटेल यांच्या खांद्यावर नवी जबाबदारी


  •  “एनआयपीएफपी” अध्यक्षपदी नियुक्ती; सार्वजनिक निधीच्या वापरासंबंधी मोदी सरकारला देणार सल्ला
  •  डिसेंबर २०१८ मध्ये दिला होता रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाचा राजीनामा

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या खांद्यावर नवी जबाबदारी देण्यात आली आहे. नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ पब्लिक फायनॅन्स अँड पॉलिसीच्या (एनआयपीएफपी) अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मोदी सरकारकडून पटेल यांना नवीन असाईनमेंट दिल्याचे मानले जातेय.

यापूर्वी या पदाची जबाबदारी विजय केळकर यांच्याकडे होती. केळकर हे २०१४ पासून या पदावर कार्यरत होते. उर्जित पटेल हे २२ जून रोजी एनआयपीएफपीच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेणार आहेत.

एनआयपीएफपीनं यासंदर्भातील माहिती दिली. “रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल हे २२ जून २०२० पासून चार वर्षांच्या कालावधीसाठी आमच्याशी जोडले जात असल्याचा आम्हाला आनंद होत आहे,” अशी प्रतिक्रिया एनआयपीएफपीकडून देण्यात आली. एनआयपीएफपीचे मुख्य उद्दिष्ट सार्वजनिक अर्थशास्त्राशी संबंधित क्षेत्रात धोरण ठरविण्यात योगदान करणे हे आहे. या संस्थेला अर्थ मंत्रालय, केंद्र सरकारसोबतच विविध राज्य सरकारांकडून वार्षिक अनुदानही मिळते.

उर्जित पटेल यांचा राजीनामा

मोदी सरकारशी मतभेद झाल्यामुळे २०१८ मध्ये डिसेंबर महिन्यात उर्जित पटेल यांनी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाचा राजीनामा दिला होता. रिझर्व्ह बँकेच्या बैठकीपूर्वीच त्यांनी राजीनामा दिल्याने मतभेदांच्या चर्चेला जोर आला होता. या बैठकीत मतभेद दूर करण्यावर चर्चा करण्यात येणार होती, परंतु, वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले होते.

वाद मिटल्याच्याही चर्चा

केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक यांच्यात झालेल्या वादाची पार्श्वभूमी हे या राजीनाम्याचे मुख्य कारण मानले जात होते. रिझर्व्ह बँक आणि सरकार यांच्यात काही मुद्द्यांवर वाद सुरु होता. १९ नोव्हेंबरला एक बैठक पार पडली ज्यात आरबीआय आणि केंद्र सरकारचे प्रतिनिधी होते. या बैठकीनंतर उर्जित पटेल आणि सरकार यांच्यातला वाद मिटला अशाही बातम्या समोर आल्या होत्या. परंतु त्यानंतरही त्यांनी राजीनामा दिला होता. परंतु आता त्यांना एक नवी जबाबदारी मिळाली आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती