दारिस्त्याच्या स्वप्नालीच्या घरात पीएमओने पोहोचवले इंटरनेट

  • अभ्यासाच्या जिद्दीने गावालाही मिळाली नेट कनेक्टिव्हिटी

विशेष प्रतिनिधी

मुंबई : तळ कोकणातील गाव दारिस्ते, जिल्हा सिंधुदुर्ग. गाव दुर्गम त्यामुळे नेट कनेक्टिव्हिटी नाही. दारिस्त्याची कन्या स्वप्नाली सुतार लॉकडाऊनमुळे गावात अडकलेली. ती मुंबईच्या व्हेटर्नरी कॉलेजची विद्यार्थिनी. ऑनलाईन क्लास सुरू झाले पण नेट अभावी तिला क्लास अटेंड करता येईनात. तिच्या भावांनी तिला गावाबाहेर दोन किलोमीटर अंतरावर एक शेड बांधून दिली. तिथे नेटची रेंज येत होती.

स्वप्नाली तिथे बसून ऑनलाईन लेक्चर अटेंड करू लागली. तिचा असा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर रेडिओ, दूरदर्शनने दखल घेऊन तिच्या जिद्दीने शिकण्याच्या प्रयत्नांची बातमी एेकवली आणि दाखविली. दिल्लीतल्या साऊथ ब्लॉकच्या पंतप्रधान कार्यालयापर्यंत ही बातमी पोहोचली. पंतप्रधान कार्यालयाने ताबडतोब स्वप्नालीच्या जिद्दीची दखल घेऊन इंटरनेट तिच्या घरापर्यंत पोहचविण्याचा निश्चय केला.

भारत नेटचे अधिकारी दारिस्त्यात पोहोचले. त्यांनी आवश्यक ती तांत्रिक पूर्तता केली. ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत केबल टाकली. तेथून स्वप्नालीच्या घरापर्यंत केबल नेली. स्वप्नालीला नेट कनेक्शन उपलब्ध झाले. ती घरच्या घरी ऑनलाईन लेक्चर अटेंड करू लागली. पंतप्रधान कार्यालयाने दखल घेऊन आपल्या घरापर्यंत नेट आणून दिले यावर स्वप्नालीचा आणि तिच्या कुटुंबीयांचा विश्वासच बसत नाहीए.

स्वप्नालीच्या जिद्दीने केवळ तिच्या घरापर्यंतच नव्हे, तर दुर्गम गावापर्यंत नेट कनेक्शन उपलब्ध झाले आहे. स्वप्नालीने मीडियाचे, पंतप्रधान कार्यालयाचे आभार मानले आहेत.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*