दरबारी अहमद पटेलांची अशीही लिटमस टेस्ट, कॉंग्रेस अध्यक्षपदाबाबत केले हे मत व्यक्त

कॉंग्रेसच्या संस्कृतीत मुरलेल्या आणि दरबारी राजकारणातील चाणक्य समजल्या जाणाऱ्या अहमद पटेल यांनी आपल्या एका वक्तव्याने लिटमस टेस्ट करून पाहिली आहे. गांधी कुटुंबाबाहेरील नेता देखील काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष बनू शकतो, असे म्हणून गांधी कुटुंबाविरोधात कोण जाऊ पाहतोय, हे तपासण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कॉंग्रेसच्या संस्कृतीत मुरलेल्या आणि दरबारी राजकारणातील चाणक्य समजल्या जाणाऱ्या अहमद पटेल यांनी आपल्या एका वक्तव्याने लिटमस टेस्ट करून पाहिली आहे. गांधी कुटुंबाबाहेरील नेता देखील काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष बनू शकतो, असे म्हणून गांधी कुटुंबाविरोधात कोण जाऊ पाहतोय, हे तपासण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.

सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांच्याकडून अध्यक्षपदाबाबत अशा पध्दतीचे वक्तव्य आल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. परंतु, दरबारी राजकारणाचा अर्क असलेल्या पटेल यांच्या राजकीय डावाची चर्चा सुरू झाली आहे. कॉंग्रेस अध्यक्षपदी पुढील सहा महिने सोनिया गांधी असणार आहेत. परंतु, पुढील तयारी करून कॉँग्रेस अध्यक्षपदाची इच्छा बाळगणार्या नेत्याला आताच कापण्यासाठी त्यांनी हे म्हटल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीपूर्वी काँग्रेसच्या २३ ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रानंतर काँग्रेसमध्ये सुरू झालेल्या हालचालींनंतर अहमद पटेल यांनी हे मत व्यक्त केले आहे. देशातील चीनी व्हायरसची परिस्थिती सुधारल्यावर पक्षाध्यक्षाची निवडणूक घेतली जाणार आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक घेतली जाईल आणि गांधी कुटुंबाच्या बाहेरील नेता देखील निवडणूक लढवून अध्यक्ष बनू शकतो, असे वक्तव्य अहमद पटेल यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

पक्षाने आता गांधी कुटुंबाबाहेरील नेत्याची अध्यक्षपदी निवड करावी असे ऑगस्ट २०१९ मध्येच सोनिया गांधी यांनी काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत सांगितले होते. ज्या नेत्याची अध्यक्षपदी निवड होईल त्याने एकजुटीने काम करावे, असेही सोनिया गांधी यांनी म्हटल्याची आठवणही अहमद पटेल यांनी करून दिली आहे.

पत्र लिहिणार्या २३ नेत्यांना पुन्हा एकदा सुनावताना अहमद पटेल म्हणाले की, पत्र लिहिणे हा पक्षाचा अंतर्गत मामला आहे. संसदीय बोर्ड, संवेदनील प्रकरणांवर लोकांशी विचार-विनिमय करण्याची पक्षात एक व्यवस्था आहे, या व्यवस्थेत सोनिया गांधी या अध्यक्ष म्हणून काम करत राहतील आणि सोनिया गांधी यांना मदत करण्यासाठी एक व्यवस्था तयार केली जाईल. पत्रामधील अनेक गोष्टी विरोधाभासी आहेत. जसे की एका ठिकाणी पक्ष नेतृत्वाला ग्रेट म्हटले आहे, तर दुसरीकडे सामूहिक लीडरशीपची चर्चा करण्यात आली आहे, असे अहमद पटेल म्हणाले.

राहुल गांधी यांनी पुन्हा पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारावे, याचे समर्थन काँग्रेस कार्यकारी समितीच्या सदस्यांनी केले होते. विद्यमान काँग्रेस अध्यक्षांनाही मतभेद दूर करण्याचा अनुभव आहे आणि त्यांनी नव्या विचारांसाठी दरवाजे नेहमीच उघडे ठेवले आहेत. काँग्रेस कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीवर लक्ष ठेवून आहे. परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अधिवेशन बोलावले जाईल. त्यानंतर पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीत गांधी कुटुंबातील व्यक्ती किंवा बाहेरील व्यक्ती, ज्या व्यक्तीला सर्वाधिक मते मिळतील, तो अध्यक्ष होईल.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*