डॉ. शीतल विकास आमटेंची लोकसत्ताकारांना पुरस्कार वापसी


  • संपादक गिरीश कुबेरांना पत्र; दोन वर्षांपूर्वीचा दुर्गा पुरस्कार केला परत

विशेष प्रतिनिधी

नागपूर : लोकसत्ताने दोन वर्षांपूर्वी दिलेला दुर्गा पुरस्कार डॉ. शीतल विकास आमटे यांनी लोकसत्ताला परत केला आहे. लोकसत्ताने काही दिवसांपूर्वी वृत्तमालिकेचे दोन भाग प्रसिद्ध करून आनंदवनातील कथित व्यवहारांवर प्रकाश टाकला होता. या बातम्या कोणतीही शहानिशा न करता प्रसिद्ध केल्याचे डॉ. शीतल आमटे यांनी नमूद केले आहे. लोकसत्ताचे संपादक डॉ. गिरीश कुबेर यांना खरमरीत पत्र लिहून शीतल आमटेंनी पुरस्कारवापसी केली आहे.

डॉ. शीतल आमटे यांचे पत्र :

प्रिय गिरीशकाका (कुबेर),

प्रिय काका म्हणताना आता मला कसेसेच वाटते. कोणे एके काळी आपण अतिशय जवळ होतो. तुमचा माझ्यावर खूप विश्वास होता. आपण कितीतरी गप्पा करायचो. कितीतरी चांगल्या योजनाही बनवल्या. सर्वकार्येशुसर्वदाचे स्नेहमीलन आनंदवनला आपण घेणार होतो.

अचानक काय झाले कळले नाही. कोणीतरी तुमचे कान भरविले आणि तुम्ही विश्वास ठेवला. कान भरविणारा स्वतः किती विश्वासू आहे ते तुम्ही तपासले का? माझी सर्वोच्च दर्जाची मानहानी तुमच्याच वृत्तपत्राने केली, ते ही आनंदवनला येऊन, कुठलाही आकडा तपासून न बघता, त्याबद्दल आमच्या कुटुंबाला काय लाखो लोकांना खूप वाईट वाटले. यात लोकसत्तातले आणि एक्सप्रेस ग्रुपमधील मोठे पत्रकारही आहेत.

तुम्ही मला दिलेला दुर्गा पुरस्कार मी परत पाठवते आहे. दोन वर्षांपूर्वी, 2018 साली आनंदवनात मी अतिशय चांगले काम करते असे माझे भरभरून कौतुक करत ‘लोकसत्ता’ने मला कार्याला सलाम म्हणून हा पुरस्कार दिला आणि नुकतीच माझे काम किती वाईट आहे यावर दोन भागांची मालिका पण केली. त्यामुळे एकतर पुरस्कार देताना आपली भूमिका चुकली आहे किंवा हे जे काय लेख म्हणा ते लिहिण्यामागची भूमिका चुकली आहे.

मला पूर्वी वाटायचे फक्त राजकीय नेतेच सोयीनुसार भूमिका बदलतात पण त्यात तुमच्यासारखे संपादकही असतील असे मला कधीच वाटले नव्हते. तेव्हा तुमची ही अडचण दूर करण्यासाठी मी तुम्हाला मदत करते. मी क्रूर आणि वाईट आहे याच निष्कर्षाला तुम्ही ठाम रहा आणि त्यासाठी मला तुम्ही दिलेला पुरस्कार मी परत करते आहे.

फक्त इथून पुढे अशा निवड करताना थोडी काळजी घ्या. मदर तेरेसा यांच्यावरील अग्रलेख तुम्ही दडपणापोटी मागे घेतला होता. हा विश्वविक्रम फक्त संपादक म्हणून तुमच्याच नावावर जमा आहे. तेव्हा तसाच दिलेला पुरस्कार ही परत घेऊन मागे घेण्याची तुमची परंपरा आपण पुढे चालवावी ही विनंती.

आनंदवनवर प्रेम करणारे लाखो लोक आणि येथे राहणाऱ्या आमच्या माणसांच्या आशीर्वाद हाच माझ्यासाठी पुरस्कार आहे…

सांगोवांगी, ऐकीव माहितीवर लेख लिहून बदनामी करणाऱ्यांचा पुरस्कार मला नको आहे. त्यामुळे तो मी परत करीत आहे.

डॉ. शीतल विकास आमटे

आनंदवन

5 ऑगस्ट 2020

sheetalamte@anandwan.in

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती