डिजिटल इंडियाला बूस्टर डोस; गुगलची भारतात ७५ हजार कोटींची गुंतवणूक


  • पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चेनंतर सुंदर पिचईंची घोषणा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतात डिजिटल इकॉनॉमीला प्रोत्साहन देण्यासाठी गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई यांनी गुगल भारतामध्ये ७५ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली आहे. पुढील पाच ते सात वर्षांमध्ये ही गुंतवणूक केली जाणार असल्याचे पिचई यांनी स्पष्ट केले.

पिचई यांनी आज सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. त्यानंतर पिचई यांनी एका ब्लॉग पोस्टमधून ही घोषणा केली. एएनआय या वृत्तसंस्थेनेही यासंदर्भातील माहिती दिली आहे.

“आम्ही आज गुगल फॉर इंडिया मोहिमेअंतर्गत १० बिलीयन डॉलरच्या (७५ हजार कोटी रुपये) गुंतवणूकीची घोषणा केली. भारताच्या डिजीटल अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आम्ही ही घोषणा करत आहोत. आम्हाला यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिजीटल इंडियाच्या व्हिजनमुळे पाठिंबा मिळाला त्यासाठी त्यांचे धन्यवाद. त्याचप्रमाणे मंत्री रवीशंकर प्रसाद आणि मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांचेही आभार,” असे ट्विट पिचई यांनी केले आहे.

गुगलकडून करण्यात येणारी गुंतवणूक ऑपरेशन्स व डिजिटल क्षेत्रातील पायाभूत सुविधा यांच्याशी संबंधित असणार आहे असंही पिचई यांनी म्हटलं आहे.  मोदींनी सकाळी पिचई यांच्यासोबतच्या बैठकीची माहिती दिली होती.

“भारतामध्ये वेगवेगळे प्रयोग सुरू असून त्याला इतर जगालाही फायदा होऊ शकतो. भारताची डिजीटल आगेकूच सुरू आहे. अजूनही भारतामधील लाखो लोक स्वस्त इंटरनेटच्या सेवेपासून दूर आहेत. सर्वांसाठी व्हॉइस इनपूटची सेवा उपलब्ध करून देण्यापासून ते सर्व भारतीय भाषांमध्ये कंप्युटींगचा पर्याय उपलब्ध करुन देण्यापर्यंत अनेक काम बाकी आहेत. नवीन उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी याची गरज आहे. म्हणून आम्ही मागील काही वर्षांपासून वेगवगेळ्या माध्यमातून भारतामध्ये गुंतवणूक केली आहे.” असे पिचई आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे.

“आज भारतामधील सोयी सुविधांचा दर्जा वाढवण्यासाठी डिजीटलायझेशन फंडची घोषणा करताना मला आनंद होत आहे. आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून पुढील पाच ते सात वर्षांमध्ये भारतात ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहोत. आम्ही इक्विटीच्या माध्यमातून, भागीदारीमधून तसेच ऑप्रेशनल क्षेत्रामधून गुंतवणूक करणार आहोत. याच प्रमाणे डिजीटलायझेशनसंदर्भातील बांधकाम आणि इकोसिस्टीम (व्यवस्था) निर्माण करण्यासाठी गुंतवणूक करण्यात येईल. आम्हाला भारताच्या भविष्यावर आणि त्याच्या डिजीटल अर्थव्यवस्थेवर विश्वास आहे हेच या गुंतवणूकीमधून दिसून येत आहे,” असे पिचई यांनी स्पष्ट केले.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती