ठाकरे – पवारांच्या राज्यात रूग्णांची खासगी रुग्णालयांकडून लुटमार

  • आरोग्य विभागाच्या चौकशीची फडणवीस, दरेकरांची मागणी

विशेष प्रतिनिधी

मुंबई : ठाकरे – पवारांच्या राज्यात खासगी रुग्णालये कोरोना रूग्णांची वाट्टेल तशी बिले लावून खुलेआम लूटमार करीत आहेत. ही लूटमार रोखण्यात ठाकरे – पवार सरकार अपयशी ठरल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला.

रुग्णांची लूटमार रोखण्यासाठी कागदी घोडे नाचविणाऱ्या आरोग्य विभागाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.

फडणवीस म्हणाले, “केवळ सर्वसामान्य कोरोना रुग्ण खासगी रुग्णालयांच्या लूटमारीबद्दल बोलत नाहीत तर सत्ताधारी शिवसेनेचे अनेक पदाधिकारीही याबाबत बोलत आहेत. ठाणे शहराचे महापौर नरेश म्हस्के यांनी तर याबाबत महापालिका आयुक्तांनाच पत्र लिहिले आहे. राज्यात सत्तेत असल्याने शिवसैनिकांची अवस्था तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी झाली आहे.”

जवळपास पाच महिने खासगी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांकडून लाखांनी उपचाराची बिले वसूल केली जात आहेत. काही रुग्णालयात तर दिवसाचे उपचाराचे बिल पन्नास हजार ते एक लाख रुपये आकारण्यात येत आहे. प्रामुख्याने मुंबई व ठाणे जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांनी कोरोनाच्या रुग्णांकडून उपचारासाठी किती रक्कम आकारावी याचे ताळतंत्र सोडल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात आणून दिले.

सरकारने ३० एप्रिल रोजी व २१ मे रोजी दोन आदेश जारी केले होते. त्यानुसार कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी खासगी रुग्णालयातील ८० टक्के बेड राखून ठेवण्याचा आदेश ३० एप्रिल रोजी जारी झाला तर २१ मे रोजी खासगी रुग्णालयातील लूटमार रोखण्यासाठी नेमके किती दर रुग्णालयांनी आकारावे त्याचा आदेश जारी करण्यात आला. आजपर्यंत राज्यातील किती खासगी रुग्णालयातील ८० टक्के बेड सरकारने कधीपासून राखून ठेवले व रुग्णांची लूटमार रोखण्यासाठी काढलेल्या आदेशानुसार किती रुग्णालयांवर कारवाई केली ते सरकारने हिंमत असेल तर जाहीर करावे असे आव्हानही त्यांनी दिले.

घराबाहेर न पडणारे मुख्यमंत्री भरारी कसे मारणार?

मुंबईत बहुतेक पंचतारांकित रुग्णालयांनी गेल्या पाच महिन्यात पोटभर लुटून घेतल्यानंतर जागे झालेल्या सरकारने आता एक नवीन फतवा काढला आहे. रुग्णांची लूटमार रोखण्यासाठी भरारी पथक स्थापन करण्याची घोषणा केली. पण घराबाहेर न पडणारे राज्याचे नेतृत्व असताना भरारी पथके कशी भरारी मारणार असा सवाल मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला.

मुंबईत नानावटी रुग्णालयाच्या अनेक तक्रारी  आल्याने रडतखडत महापालिकेने एक गुन्हा दाखल केला. मुंबईतील बहुतेक माध्यमातून उपचारांसाठी लाखो रुपयांची बिले,रुग्णांची लूटमार ‘अशा अनेक बातम्या येऊनही सरकारमधील धृतराष्ट्र अजूनही वस्तुस्थिती समजून घेण्यास तयार नसल्याचे प्रवीण दरेकर यांनी सांगितले. आता आरोग्य विभागाने एक आदेश जारी करून राज्यातील सर्व पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच संबंधित अधिकाऱ्यांना भरारी पथक स्थापन करून जादा बिल आकारणीची तपासणी करण्यास सांगितले आहे. तसेच तीन दिवसात याबाबतचा अहवाल सादर करण्यास आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे.

गेल्या पाच महिन्याच्या खासगी रुग्णालयांच्या लुटमारीचा हिशेब एवढे दिवस बघ्याची भूमिका घेणारे आयुक्त, जिल्हाधिकारी व संबंधित अधिकारी तीन दिवसात कसा सादर करणार, असा सवाल प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला. आरोग्य विभाग व सरकारची फसवाफसवी आहे. लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा हा उद्योग असल्याचे प्रवीण दरेकर म्हणाले.

आरोग्य विभागाने कोरोना उपचाराचे दर निश्चित केल्यापासून तसेच खासगी रुग्णालयातील ८० टक्के ताब्यात घेण्याचा आदेश आरोग्य विभागाने जारी केल्यापासून आजपर्यंत राज्यातील सर्व पालिका आयुक्त व जिल्हाधिकार्यांनी काय कारवाई केली याची माहिती सर्वप्रथम प्रधान सचिव व्यास यांनी मागवायला हवी होती, असे फडणवीस यांनी सांगितले. आदेश काढूनही गेले चार महिने आरोग्य विभाग गप्प का याची सर्वप्रथम चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*