ठाकरे घराण्यातील समांतर युवा नेतृत्वामध्ये वैद्यकीय परीक्षा श्रेयवादाची स्पर्धा


  •  मुख्यमंत्री कार्यालयातून २५ तारखेला पत्राचे ट्विट; पत्रावर तारीख १८; अमित ठाकरेंची २२ तारखेला भेट, श्रेयवादातून “तारखांचा खो – खो”

विशेष प्रतिनिधी

मुंबई : वैद्यकीय परीक्षा रद्द करण्याच्या मागणीपत्रावरून ठाकरे घराण्यातील दोन समांतर युवा नेतृत्वात श्रेयवादाची स्पर्धा रंगताना दिसतेय. याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेले पत्र कारणीभूत ठरतेय. या पत्रामुळे श्रेयवादाचे राजकारण सुरु झाले आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्या विनंतीनंतर मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले, असे चित्र निर्माण होऊ नये आणि श्रेय अमित ठाकरेंना जाऊ नये यासाठी पत्रावर जुनी तारीख टाकली का? असे विचारणा व्हायला लागली आहे. टीव्ही 9 ने या बाबतची बातमी दिली आहे.

एमडी आणि एमएस वैद्यकीय परीक्षा यंदा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी विनंती करणारे मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना पाठविले. मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटने हे पत्र काल २४ जूनला रात्री उशिरा ट्वीट केले. पण पत्रावरची तारीख १८ जून अशी दिसते. त्यामुळे १८ जून रोजी पंतप्रधानांना लिहिलेले पत्र सहा दिवसांनी ट्वीट का करण्यात आले? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मनसे नेते अमित ठाकरे यांची अलिकडेच निवासी डॉक्टर्सनी भेट घेतली होती. कोविड प्रादूर्भावात खूप काम करत असल्याने अभ्यास करण्यास पुरेसा वेळ मिळालेला नाही, त्यामुळे परीक्षांमध्ये सूट मिळावी, हा मुद्दा त्यांनी अमित ठाकरे यांच्याकडे मांडला होता. अमित ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची २२ जूनला भेट घेऊन या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती.

या प्रकरणात आता श्रेयावरून स्पर्धा सुरू झाली आहे का? असा प्रश्न उद्भवत आहे. कारण निवासी डॉक्टर्सच्या परीक्षांचा मुद्दा मोठा आहे. परीक्षा पुढे ढकलल्या गेल्यास त्याचे श्रेय अमित ठाकरे यांना मिळू शकते. ही खरी पोटदुखी आहे.

अमित ठाकरे यांचे पत्र काय?

“संपूर्ण देशात कोविड रुग्णांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. या वैद्यकीय लढाईत सुमारे 2500 निवासी डॉक्टर्स दिवसरात्र रुग्णसेवा बजावत आहेत. वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण (डिग्री आणि डिप्लोमा अंतिम वर्ष) घेणारे विद्यार्थी – निवासी डॉक्टर्स गेले अडीच-तीन महिने प्रचंड तणावाखाली आहेत. सुस्पष्ट धोरणाअभावी परीक्षेची टांगती तलवार त्यांना छळत आहे. ही परीक्षा आता १५ जुलैपासून घेण्यात येणार आहे. हा निर्णय घेताना २४ तास रुग्णांसाठी उपलब्ध राहणाऱ्या निवासी डॉक्टरांच्या शारीरिक तसेच मानसिक क्षमतांचा विचारही महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने केलेला नाही”, असे अमित ठाकरे यांनी पत्रात म्हटले होते.

अमित ठाकरे यांनी कोविड वातावरणात डॉक्टर्स, परिचारिका, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी तसंच आशा स्वयंसेविका यांच्या मागण्यांचे मुद्दे घेऊन राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. लॉकडाऊनच्या काळात पुण्यात अडकलेल्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्याना त्यांच्या घरी पोचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी फोनवर संवाद साधत सरकारकडून वाहन व्यवस्था उपलब्ध करुन देणे, बंधपत्रित डॉक्टर्सच्या मानधनात राज्य सरकारकडून वाढ करुन देणे आणि आशा स्वयंसेविकांबाबत उपमुख्यमंत्र्यांची भेट घेत त्यांच्या मानधनात वाढ करुन देणे असे मुद्दे अमित ठाकरे यांनी हाताळले होते.

ठाकरे घराण्यात आदित्य यांचे युवा नेतृत्व असतानात अमित ठाकरे यांचे समांतर नेतृत्व पुढे लागले आहे. यातूनच स्पर्धेचे राजकारण सुरु होऊन मनसेकडे जाऊ शकणारे श्रेय थांबवण्यासाठी तारीख बदलली की खरेच जुने पत्र उशिराने ट्वीट झाले, हा संशोधनाचा मुद्दा ठरतो आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था