छत्रपतींविषयी वाद करून मतलब साधण्याचा कॉंग्रेसचा डाव, चंद्रकांत पाटील यांची टीका

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वाद निर्माण करून त्याच्या आधारे आपला राजकीय मतलब साधण्याचा प्रकार काँग्रेस पक्षाकडून सुरू आहे. अपयशामुळे काँग्रेस पक्ष हताश झाला असला तरी आपले राजकीय महत्त्व टिकविण्यासाठी काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर करून वाद निर्माण करू नये, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वाद निर्माण करून त्याच्या आधारे आपला राजकीय मतलब साधण्याचा प्रकार काँग्रेस पक्षाकडून सुरू आहे. अपयशामुळे काँग्रेस पक्ष हताश झाला असला तरी आपले राजकीय महत्त्व टिकविण्यासाठी काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर करून वाद निर्माण करू नये, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

पाटील म्हणाले की, श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे यांनी काही दिवसांपूर्वी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला. काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जून खर्गे व गुलाम नबी आझाद यांनी या जयघोषाला आक्षेप घेतला. त्यामुळे सभापती व देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी नियम स्पष्ट केले. त्यावरून पद्धतशीर गदारोळ केला गेला.

सभापतींनी शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यापासून रोखल्याचा अत्यंत चुकीचा आरोपही केला गेला. काँग्रेस नेत्यांनी उदयनराजे यांच्या घोषणेला आक्षेप घेतला नसता तर पुढे काही घडलेच नसते. ते म्हणाले की, कर्नाटक राज्यात बेळगाव जिल्ह्यात मनगुत्ती येथे नुकताच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविण्यावरून वाद झाला. स्थानिक गावकऱ्यांच्या दोन गटातील वादातून हा प्रसंग निर्माण झाला.

कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी स्थानिक आमदार आहेत. त्यांची या वादात भूमिका आहे. या वादात महाराष्ट्रातील नेत्यांनी पडू नये, असे जारकीहोळी यांचे वक्तव्य प्रसिद्ध झाले आहे.

काँग्रेस नेत्याशी संबंधित घडामोडींमुळे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वाद होणे व राजकीय गदारोळ होणे हा प्रकार पुन्हा घडला. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारताचे दैवत आहेत, असे सांगून पाटील म्हणाले, काँग्रेस पक्षाकडून गेल्या काही दिवसात शिवाजी महाराजांविषयी वाद निर्माण करण्याचा व त्याच्या आधारे भारतीय जनता पार्टीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचा मी निषेध करतो.

काँग्रेसला भाजपाशी जो काही राजकीय संघर्ष करायचा असेल तो त्यांनी जरूर करावा, आम्ही त्याला सडेतोड उत्तर देऊ. पण काँग्रेसने या राजकारणात छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर करू नये, असे पाटील यांनी कॉंग्रेसला सुनावले आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*