चीनी मोबाईल कंपन्यांना चीनमध्येच झटका; स्मार्टफोन विक्रीत तब्बल ३५%घसरण

  • माओवादी कम्युनिस्ट सरकारनेच जारी केली आकडेवारी

वृत्तसंस्था

बीजिंग : चीनमधल्या मोबाईल उत्पादक कंपन्यांना चीनमध्येच मोठा झटका बसला आहे. चीनी उत्पादित स्मार्टफोन्सच्या विक्रीमध्ये जुलै महिन्यात गेल्या वर्षीच्या जुलैच्या तुलनेत तब्बल ३५% घट झाली आहे. कोरोना महामारीतून चीन सावरला असल्याचे सांगण्यात आले असले तरी स्मार्टफोन्सच्या मागणीत झालेल्या घट पाहता परिस्थिती अद्याप सामान्य झाली नसल्याचे दिसत आहे.

जुलै २०१९ मध्ये चीनमध्ये ३.३ कोटी स्मार्टफोन्सची विक्री झाली होती. जुलै २०२० मध्ये ३५% घटून २.१३ कोटी इतकी झाली आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेचा करोनाचा मोठा फटका बसला आहे. जगभरातील सर्वच देशांमधील वेगवगेळ्या उद्योगांना कोरोनाचा फटका बसला आहे. यामध्ये अगदी पर्यटनापासून ते विमान उद्योग आणि लहान उद्योजकांपासून लघू उद्योजक असा सर्वांचाच समावेश आहे. करोनामुळे एकीकडे सर्व देश आर्थिक संकटात सापडलेले असतानाच चीनमध्ये मात्र आर्थिक पडझड मोठ्या प्रमाणात झाली नाही अशा बातम्या चीनी सरकारी माध्यमांमधून पसरविण्यात आल्या होत्या. एवढेच काय पण केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारताची घोषणा केल्यानंतर त्याची खिल्ली उडविण्यासाठी चीनी उत्पादित मोबाईलच्या ऑनलाइन विक्रीत कशी वाढ होत आहे, हे देखील दाखविण्याचा प्रयत्न झाला.

मात्र ज्या चीनमधून करोनाचा प्रादूर्भाव सुरू झाला त्या चीनलाही या महामारीचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. चीनमधील स्मार्टफोन उद्योग क्षेत्राला किती मोठा फटका बसला आहे यासंदर्भातील आकडेवारी समोर आली आहे. चीनमध्ये करोनाच्या साथीनंतर अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती मात्र या अहवालामध्ये वेगळेच चित्र दिसून येत आहे.

चीन सरकारने मंगळवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार चीनमध्ये स्मार्टफोनच्या विक्रीमध्ये ३५% घट झाली आहे. या आकडेवारीवरून जगातील सर्वात मोठी स्मार्टफोन निर्मितीची बाजारपेठ असणाऱ्या चीनलाही करोनाच्या आर्थिक झळा सोसाव्या लागत असल्याचे स्पष्ट होत आहे. करोनाच्या पूर्वी ज्याप्रमाणे स्मार्टफोनला बाजारपेठेमध्ये मागणी होती तितकी मागणी आता नाही. त्यामुळेच स्मार्टफोन उद्योग क्षेत्राबरोबरच चीनच्या दृष्टीनेही हा चिंतेचा विषय ठरत आहे.

चीनमध्ये जुलै महिन्यामध्ये दोन कोटी १३ लाख स्मार्टफोन विकले गेले. मागील वर्षी हाच आकडा ३ कोटी ३० लाख इतका होता. ही आकडेवारी चीनमधील अकॅडमी ऑफ इन्फॉर्मेशन अ‍ॅण्ड टेक्नोलॉजीने (सीएआयसीटी) दिली आहे.

चीनच्या दृष्टीने चिंतेची बाब म्हणजे फोनची विक्री करण्यासाठी परवानग्या देण्यात आल्या आहेत, अनेक शहरांमधील लॉकडाउन हळूहळू शिथिल करण्यात आला आहे असं असतानाही जुलै महिन्यामध्ये विक्री झालेल्या स्मार्टफोनची संख्या ही मे आणि जूनमध्ये विक्री झालेल्या संख्येपेक्षाही कमी आहे. मागील वर्षीपेक्षा यंदा स्मार्टफोन विक्रीमध्ये मे महिन्यात १०% तर जून महिन्यात १६% घट पहायला मिळाली करण्यात आले. एप्रिलमध्ये स्मार्टफोनच्या विक्रीमध्ये वाढ झाली होती. मात्र त्यानंतर चीनमधील स्मार्टफोन विक्रीला उतरती कळा लागल्याचे चित्र दिसत आहे. २०१९ साली एप्रिल महिन्यात विक्री करण्यात आलेल्या स्मार्टफोनपेक्षा या वर्षी एप्रिलमध्ये १७% अधिक स्मार्टफोनची विक्री झाली. एप्रिलच्या आधीही स्मार्टफोनच्या विक्रीमध्ये घसरणच दिसून आली होती. या कालावधीमध्ये चीनमध्ये करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला होता.

एप्रिलमधील याच आकडेवारीमुळे चीनमधील स्मार्टफोन बाजारपेठ चार महिन्यानंतर पुन्हा सावरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र अपेक्षेपेक्षा उलटच घडलं आहे. एप्रिलपासून दर महिन्याला विक्री करण्यात येणाऱ्या स्मार्टफोनची संख्या कमी झाल्याचे दिसून येत आहे. चीनमध्येही स्मार्टफोनची विक्री पुन्हा सुरु झाली असल्याने मोठ्या प्रमाणात स्मार्टफोनला मागणी वाढेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र तो ही चुकीचा ठरला. त्यामुळेच आता हे आकडे २०१९ च्या स्तरावर कसे आणायचे यासंदर्भात विचार विनिमय सुरु असल्याचे समजते.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*