चीनच्या दादागिरीला लगाम; भूतानच्या मदतीला भारत

  • भूतानच्या साकतेंग अभयारण्यावर चीनचा दावा भारताने खोडला

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : दुसऱ्या देशांची जमीन हडप करणाऱ्या चीनच्या दादागिरीला भारताने लगाम घातला आहे. भूतानच्या साकतेंग अभयारण्याच्या भूमीवर चीनने दावा ठोकताच भारताने तो खोडून काढला.

ग्लोबल एन्वायरमेंटफॅसिलिटी कौन्सिलच्या ५८ व्या बैठकीत चीनने भूतानमधील साकतेंग वन्यजीव अभयारण्याचा भूभाग वादग्रस्त असल्याचे सांगताच भूतानने चीनच्या या वक्तव्याचा कठोर शब्दात निषेध केला आणि तो भूतानचा अविभाज्य भाग असल्याचेही स्पष्ट केले. या कौन्सिलमध्ये भूतानचा थेट प्रतिनिधी नाही. भारताचा प्रतिनिधीच भूतान, बांगलादेश आदी छोट्या देशांचे प्रतिनिधित्व करतो. याच प्रतिनिधीने चीनचा दावा खोडून काढला.

चीनच्या दाव्याच्या विरोधात, वास्तविकता अशी आहे की मागील अनेक वर्षांमध्ये अभयारण्याच्या भूभागाबद्दल कधीही वाद झाला नव्हता. तथापि, भूतान आणि चीन दरम्यान कोणतेही सीमांकन झालेले नाही. चीनच्या या दाव्याचा भूतातने कडाडून विरोध केला आहे, “साकतेंग वन्यजीव अभयारण्य भूतानचा अविभाज्य व सार्वभौम भूभाग आहे,” असे भूतानने स्पष्ट केलं आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या बातमीनुसार, या संपूर्ण वादातील एक महत्त्वाची बाब म्हणजे हे वन्यजीव अभयारण्याला कोणत्याही प्रकारचा जागतिक निधी देण्यात आलेला नाही. परंतु जेव्हा या अभयारण्यासाठी पहिल्यांदा निधी देण्याची गरज भासली तेव्हा चीनने या संधीचा फायदा घेत या भूभागावर आपला दावा ठोकला. चीनच्या या प्रकल्पाला केलेल्या विरोधानंतरही कौन्सिलनं याला मंजुरी दिली आहे.

या कौन्सिलमध्ये जेथे चीनचा थेट प्रतिनिधी आहे, तेथे भूतानचा कोणताही थेट प्रतिनिधी या कौन्सिलमध्ये नाही. भूतानचे प्रतिनिधीत्व भारताच्या जेष्ठ आयएएस अधिकारी अपर्णा सुब्रमणी या करत आहेत. त्या जागतिक बँकेत बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाळ आणि श्रीलंकेच्या प्रभारीदेखील आहेत. यापूर्वी २ जून रोजी प्रत्येक योजनेप्रमाणे चर्चा सुरू असताना चीनी कौन्सिलचे सदस्य झोंगजिंग वांग यांनी त्यावर आक्षेप घेतला होता.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*