कधीच टिकटॉक डाउनलोड केले नाही, पण नुकतेच चिंगारी डाउनलोड केलय : आनंद महिंद्रा
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशभरात चीनविरोधी जनभावना जोर धरत आहे. चीनी वस्तूंवरील बहिष्काराचा फटका काही चीनी कंपन्यांना बसलाय, तर अनेक भारतीय कंपन्यांना मात्र याचा फायदा होतोय. शॉर्ट व्हिडिओ मेकिंग सेगमेंटमधील आघाडीच्या टिक टॉक या चीनी मोबाइल अॅपच्या लोकप्रियतेत घट झाली आहे.
चिनी अॅप टिकटॉकच्या विरोधाचा जबरदस्त फायदा ‘चिंगारी’ या एका मेड इन इंडिया मोबाइल अॅपला झाला आहे. TikTok ला भारतीय पर्याय म्हणून हे अॅप प्रचंड लोकप्रिय होत असून काही दिवसांमध्येच २५ लाखांहून अधिक हे अॅप डाउनलोड झालेय. अशातच महिंद्रा अँड महिंद्राचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी टिकटॉकचे ‘टेन्शन’ अजून वाढवणारे ट्विट केलं आहे. “मी आतापर्यंत कधीच टिकटॉक अॅप डाउनलोड केले नाही, पण मी चिंगारी अॅप डाउनलोड केले आहे”, असे महिंद्रांनी सांगितलं. ट्विटरद्वारे, ‘टिकटॉकच्या मागणीत घट आणि चिंगारीची लोकप्रियता वाढली’ ही बातमी शेअर करत महिंद्रांनी हे ट्विट केले आहे.
काय आहे चिंगारी अॅप?
TikTok चा भारतीय पर्याय असलेले हे अॅप छत्तीसगडचे आयटी प्रोफेशनल्स आणि ओडिशा व कर्नाटकच्या डेव्हलपर्सनी बनवलं आहे. “हे अॅप बनवण्यासाठी जवळपास दोन वर्षांचा कालावधी लागला. खास भारतीय युजर्सच्या गरजा आणि आवड लक्षात घेऊ हे अॅप डिझाइन करण्यात आलं आलं आहे”, असं भिलाईमधील रहिवासी आणि चिंगारी अॅपचे चीफ ऑफ प्रोडक्ट सुमित घोष यांनी यापूर्वी सांगितलं आहे.
“आम्हाला भारतीय युजर्सचा शानदार प्रतिसाद मिळतोय, आणि काही दिवसांमधील आकडेवारीनुसार हे अॅप २५ लाखांहून जास्त डाउनलोड झाले आहे, असे सुमितने सांगितले. चिंगारी अॅप नोव्हेंबर २०१८ मध्ये गुगल प्ले स्टोअरवर अधिकृतपणे आले पण काही दिवसांपासून भारतात चिनी सामानांचा बहिष्कार करण्याची मागणी जोर धरु लागल्यानंतर चिंगारीच्या डाउनलोडिंगमध्ये मोठी वाढ झाली.
विशेष म्हणजे या अॅपने आता प्ले स्टोअरमध्ये फ्री अॅप्सच्या टॉप चार्टमध्ये जागा मिळवली आहे. ओडिशाच्या विश्वात्मा नायक आणि कर्नाटकच्या सिद्धार्थ गौतम यांनी हे अॅप डेव्हलप केलं आहे. भारतात तयार केलेलं हे अॅप TikTok ला थेट टक्कर देतंय. चिंगारी अॅपद्वारे शॉर्ट व्हिडिओ बनवता येतात आणि फ्रेंड्ससोबत शेअरही करण्याचा पर्याय यात आहे. या अॅपमध्ये शानदार फीचर्स असून भारतीय भाषांचा सपोर्टही आहे.
याशिवाय अॅपमध्ये ट्रेंडिंग न्यूज, एंटरटेनमेंट न्यूज, फनी व्हिडिओ, लव स्टेटस, व्हिडिओ साँग असे अनेक फीचर्स आहेत. चिंगारीवर शेअर केलेल्या पोस्टवर लाइक, कॉमेंट, शेअर करता येतील. व्हॉट्सअपवर शेअर करण्यासाठी वेगळा पर्याय आहे. एखाद्या युजरला फॉलो करण्याचाही पर्याय यामध्ये देण्यात आला आहे.