कर्नाटकात भारतीय जनता पक्षाचे सरकार असले तरी अलमट्टी धरणाची उंची वाढवून जर पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय होणार असेल या सरकारविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे : कर्नाटकात भारतीय जनता पक्षाचे सरकार असले तरी अलमट्टी धरणाची उंची वाढवून जर पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय होणार असेल या सरकारविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
पाटील म्हणाले, अलमट्टीच्या उंचीमुळे पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण झाली तर केंद्रीय नेत्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली जाईल. मुळात अलमट्टी धरणाबद्दलच्या काही बाबी न्यायप्रविष्ठ आहेत. हा महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या चार राज्यांशी संबंधीत विषय आहे. त्यामुळे पंतप्रधान किंवा केंद्र सरकार घाईगडबडीने किंवा एकांगी निर्णय घेणार नाहीत.
तथापी कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याबाबत आपली भूमिका कायम ठेवली, तर त्यांनाही पश्चिम महाराष्ट्रावर होणाऱ्या अन्यायाची कल्पना देऊ. तसेच केंद्र स्तरावरही धरणाची उंची वाढल्यानंतर निर्माण होणाऱ्या परिणामांची जाणीव करून देऊ आणि सर्वसमावेशक आणि व्यापक हिताचा निर्णय घेण्यास भाग पाडू, असे पाटील म्हणाले.
कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रावर महापुराची टांगती तलवार कायम राहणार नाही, यासाठी दक्ष राहू. सन २०१९ सालच्या महापुराची भीषणता, त्यातून झालेले नुकसान याची पूर्ण जाणीव असल्याने, या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पूर्ण क्षमतेने आणि अभ्यासाने कार्यरत असल्याचे पाटील म्हणाले.