काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद आक्रमक झाले आहेत. कॉंग्रेसच्या रचनेत बदल करावे अशी मागणी केल्यावरून त्यांच्यासह इतर नेत्यांवर टीका करणाऱ्यांना त्यांनी चांगलेच सुनावले आहे. आमच्या प्रस्तावाचा विरोध करणाऱ्यांना माहिती आहे की, निवडणूक झाल्यानंतर ते कुठेच दिसणार नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांचा निशाणा राहुल गांधी यांच्यावर तर नाही ना अशी चर्चा सुरू झाली आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कॉंगेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद आक्रमक झाले आहेत. कॉंग्रेसच्या रचनेत बदल करावे अशी मागणी केल्यावरून त्यांच्यासह इतर नेत्यांवर टीका करणाऱ्यांना त्यांनी चांगलेच सुनावले आहे.
आमच्या प्रस्तावाचा विरोध करणाऱ्यांना माहिती आहे की, निवडणूक झाल्यानंतर ते कुठेच दिसणार नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांचा निशाणा राहुल गांधी यांच्यावर तर नाही ना अशी चर्चा सुरू झाली आहे.
कॉंग्रेस अध्यक्षपदी पूर्णवेळ व कार्यक्षम व्यक्तीची निवड करण्यात यावी, अशी मागणी करत पक्षातील २३ वरिष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं होतं. या पत्रावरून काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह निर्माण झाला होता. त्यानंतर काँग्रेस कार्यसमितीच बैठक पार पडली. या बैठकीतही गोंधळ झाला होता. त्यानंतर अध्यक्ष निवडीच्या वाद शमला गेला.
मात्र, काँग्रेसचे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते व सोनिया गांधी यांना पत्र लिहिणाऱ्या नेत्यांपैकी एक असलेले गुलाम नबी आझाद यांनी प्रस्तावाला विरोध करणाऱ्यांना फटकारलं आहे. जे पदाधिकारी वा राज्यांचे प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आमच्या प्रस्तावाचा विरोध करत आहेत, त्यांना माहित आहे की निवडणुका झाल्यास ते कुठेच दिसणार नाही. जे कुणी काँग्रेसच्या हिताचा विचार करत आहेत, ते आमच्या पत्राचं स्वागतच करतील.
निवडणुकीचा एक फायदा असा होतो की, तुम्ही निवडणूक लढवता, तेव्हा कमीत कमी पक्ष तुमच्यासोबत उभा राहतो. सध्या अध्यक्ष होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीला एक टक्केही पाठिंबा मिळू शकत नाही. कार्यसमितीचे सदस्य निवडून आले, त्यांना हटवता येत नाही. मग समस्या काय आहे, असा प्रश्नही आझाद यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, कॉंग्रेसच्या अंतर्गत कामकाजात ज्या कुणाला खरच रस असेल तो प्रत्येक राज्य आणि जिल्हाध्यक्ष निवडला जावा, या आमच्या प्रस्तावाचं स्वागत करेल. संपूर्ण कॉंग्रेस कार्यकारिणी नव्याने निवडली जावी.
पत्र लीक झालं असलं तरी त्यामुळे असं काय झालं? पक्ष बळकट करण्यासाठी आणि निवडणुका घेण्याची सूचना करणं यात कोणतंही गुपित नाही. इंदिरा गांधीजींच्या काळातही मंत्रिमंडळाची कार्यवाही लीक झाली होती, असे आझाद यांनी सांगितले. पत्र लिहिल्यावरून काही जण आम्हाला शिवीगाळ करत होते, तो शिस्तभंग नव्हे का? त्यांच्यावर कारवाई का होऊ नये? आम्ही कोणालाही शिवीगाळ केला नाही, असेही आझाद म्हणाले.