गरीबांनाच आघाडी सरकारचा शॉक, वीज दरवाढीचा सर्वाधिक फटका

ऐन लॉकडाऊनमध्ये वीज ग्राहकांना दरवाढीचा शॉक बसला आहे. मात्र, त्यातही आघाडी सरकारने सर्वाधिक फटका गरीबांनाच दिला आहे. शंभर युनीटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्यांनाच या दरवाढीचा मोठा फटका बसला आहे.


विशेष प्रतिनिधी

पुणे : ऐन लॉकडाऊनमध्ये वीज ग्राहकांना दरवाढीचा शॉक बसला आहे. मात्र, त्यातही आघाडी सरकारने सर्वाधिक फटका गरीबांनाच दिला आहे. शंभर युनीटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्यांनाच या दरवाढीचा मोठा फटका बसला आहे.

दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारने शंभर युनीटपेक्षा कमी वापर असलेल्यांचे वीज बिलच माफ केले आहे. त्यामुळे अर्थकारणाला वाईट वळण लागले हे अलहिदा. पण महाराष्ट्रातील आघाडी सरकारने याच्या बरोबर उलट दरवाढीचा सगळा बोजा शंभर युनीटपेक्षा कमी वीजवापर असलेल्यांवर टाकला आहे.

महावितरणच्या ग्राहकांचे वीज देयक लॉकडाऊनमध्येही वाढले अहे. त्यामागे १ एप्रिल २०२० पासून झालेली दरवाढ हे एक प्रमुख कारण आहे. विजेच्या स्थिर आकारासह इतर संवर्गातील दरवाढीने १०० युनिटच्या खालील घरगुती वीज वापर असलेल्यांना सर्वाधिक फटका बसला. तब्बल १७ टक्के दरवाढ ही ३० युनिटच्या खाली वीज वापर असलेल्या गरिबांच्या देयकात झाली आहे.

राज्यातील मागील देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात महावितरणकडून वीज नियामक आयोगाकडे दरवाढीचा प्रस्ताव सादर झाला होता. मात्र, गोरगरीबांवर ही वीज कोसळू देण्यास तत्कालिन सरकारने विरोध केला होता. राज्यातील सत्तांतरानंतर वीज नियामक आयोगाने विविध ठिकाणी जनसुनावणी घेत १ एप्रिल २०२० पासूनची दरवाढ जाहीर केली. धक्कादायक म्हणजे उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ही दरवाढ अगदी अल्प असल्याचे म्हटले होते.

१०० युनिट वापर असलेल्यांना मार्चमध्ये ६०६.६८ रुपये देयक येत होते. ते १४.९१ टक्यांनी वाढून ६९७.१६ रुपयांवर (१०.६२ टक्के वाढ) गेले आहे. सुमारे शंभर रुपयांची ही वाढ लॉकडाऊनच्या काळात वीजग्राहकांचे कंबरडे मोडणारी आहे. याचा फटका राज्यातील २ कोटी ८ लाख ग्राहकांना बसणार आहे.

राज्यातील ५८ लाख घरगुती ग्राहक महिन्याला ३० युनिटपेक्षा कमी वीजवापर करतात. याचा अर्थ एखादा वीजेचा दिवा त्यांच्याकडे असतो. दीड कोटी ग्राहक १०० युनिटपेक्षाही कमी वापर करतात. मात्र, या गरीब व सामान्य कुटुंबातील ग्राहकांनाच सर्वाधिक वीज दरवाढीचा फटका सहन करावा लागत आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*