‘अयोध्या तो झाँकी है, काशी मथुरा बाकी है’, ही घोषणा प्रत्यक्षात आणण्याची मागणी करत काशी विश्वनाथ मंदिरालाही मुक्त करण्याची मागणी अखिल भारतीय आखाडा परिषदेने केली आहे.
वृत्तसंस्था
प्रयागराज : ‘अयोध्या तो झाँकी है, काशी मथुरा बाकी है,’ ही घोषणा प्रत्यक्षात आणण्याची मागणी करत काशी विश्वनाथ मंदिरालाही मुक्त करण्याची मागणी अखिल भारतीय आखाडा परिषदेने केली आहे.
अयोध्येत राम मंदिर निर्माणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर श्रीमठ वाघंम्बरी गादीवर बैठकही घेण्यात आली. या बैठकीचे अध्यक्षपद अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनी सांभाळलं. बैठकीत सर्व १३ आखाड्यांचे पदाधिकारी उपस्थित राहिले.
साधु-संतांची सर्वोच्च संस्था म्हणून ओळखल्या जाणार्या ‘अखिल भारतीय आखाडा परिषदे’ने काशी आणि मथुरेला ‘मुक्त’ करावे असे म्हटले आहे. काशी विश्वनाथ मंदिर परिसरात असलेली ज्ञानवापी ‘मशिद’ हटवण्यासाठी रणनीती तयार करण्यासाठी अखिल भारतीय आखाडा परिषदेनं ही बैठक बोलावली होती.
या बैठकीत दरवर्षी आयोजित केल्या जाणार्या माघ जत्रा आणि प्रयागराज परिक्रमा मार्गाच्या मुद्यावरही चर्चा होणार आहे. आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी म्हणाले, मोगलांनी काशी विश्वनाथ मंदिर उद्ध्वस्त करुन ज्ञानवापी मशिदी बांधली. आज इथं होणार्या खोदकामा दरम्यान मंदिराचे अवशेष आढळत आहेत. यावरून हे स्पष्ट होतं की इथं मंदिर आहे. रामजन्मभूमीनंतर आता कृष्ण जन्मभूमी आणि काशी विश्वनाथ मंदिराला मुक्त करण्याची वेळ आली आहे.
२०२१ मध्ये प्रयागराजमध्ये संगमाच्या रेतीवर माघ जत्रेचं आयोजन केलं जाणार आहे. परंतु, चीनी व्हायरसच्या उद्रेकामुळे या आयोजनाच्या तयारीवरही परिणाम होत असल्याचं नरेंद्र गिरी यांनी म्हटलंय. आखाडा परिषदेच्या या बैठकीत राज्य आणि केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेल्या गाईडलाइन्स तसंच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करण्यात येत असल्याचंही गिरी यांनी म्हटलंय.