एनसीसीचा होणार विस्तार, भारतीय लष्कर देणार प्रशिक्षण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय छात्र सेनेचा (एनसीसी) विस्तार करण्याचे संकेत लाल किल्यावरील भाषणातून दिले आहेत. त्याप्रमाणे आता एनसीसीचा विस्तार होणार असून भारतीय लष्कर प्रशिक्षण देणार आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय छात्र सेनेचा (एनसीसी) विस्तार करण्याचे संकेत लाल किल्यावरील भाषणातून दिले आहेत. त्याप्रमाणे आता एनसीसीचा विस्तार होणार असून भारतीय लष्कर प्रशिक्षण देणार आहे.

नव्या पिढीमध्ये राष्ट्रभक्ती व नेतृत्वगुण लहान वयातच रुजविण्यासाठी राष्ट्रीय छात्र सेनेची स्थापना करण्यात आली. भारतातील ‘एनसीसी’ ही जगातील तरुणांची अशा प्रकारची सर्वात मोठी गणवेशधारी संघटना म्हणून ओळखली जाते. देशातील ७१८ पैकी ७१६ जिल्ह्यांमध्ये सध्या ती कार्यरत असून, त्यातील मुले व मुली मिळून एकूण छात्रसैनिकांची संख्या १४ लाख आहे.

(एनसीसी) देशाच्या सीमांवरील, तसेच किनारी जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्याची एक विशेष योजना पुढील काही महिन्यांत राबविण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात या योजनेचे सुतोवाच केले होते. या नव्या छात्रसैनिकांचा समावेश करण्यासाठी ‘एनसीसी’च्या सध्याच्या ८४ तुकड्यांचा विस्तार केला जाईल. यापैकी ५३ लष्कराशी, २० नौदलाशी, तर १० हवाईदलाशी संलग्न असतील, असेही संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते भारत भूषण बाबू म्हणाले.

सीमावर्ती जिल्ह्यांतील नव्या छात्रसैनिक तुकड्यांना भारतीय लष्कर प्रशिक्षणाखेरीज प्रशासकीय मदत करील. किनारी जिल्ह्यांतून तुकड्यांच्या प्रशिक्षणाची व व्यवस्थापनाची जबाबदारी नौदलावर असेल, तर जेथे हवाई दलाची केंद्रे आहेत तेथे हे सैन्यदल प्रशिक्षण देईल. या छात्रसैनिकांना आपत्ती व्यवस्थापनाचेही प्रशिक्षण देण्याची योजना आहे.

या लष्करी प्रशिक्षणाने तरुणांमध्ये शिस्तबद्ध आयुष्याची आवड निर्माण होईल व त्यातून त्यांना मोठेपणी सैन्यदलांमध्ये दाखल होण्यास स्फूर्ती मिळेल, असे बाबू म्हणाले. सध्याच्या कोविड-१९ महामारीतही या छात्रसैनिकांनी खूप मोठा सहभाग दिला आहे. तसेच बिहार, तामिळनाडू व केरळमध्ये आलेल्या पूर व अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्तींच्या वेळी सैन्यदले, रेडक्रॉस व ‘एनडीआरएफ’च्या खांद्याला खांदा लावून काम केले आहे.

एक हजार शाळा व कॉलेजमधून हे नवे छात्रसैनिक निवडले जातील. यात एक लाख नवे छात्रसैनिक ‘एनसीसी’मध्ये दाखल करून घेतले जातील. त्यापैकी एक तृतीयांश मुली असतील. या नव्या योजनेची माहिती देताना संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते भारत भूषण बाबू यांनी सांगितले की, देशातील सीमांवरील, तसेच किनारी भागातील एकूण १७३ जिल्ह्यांत ही विशेष योजना राबविली जाईल. समाजात सकारात्मक बदल घडविण्याच्या दृष्टीने ही योजना दूरदृष्टीची आहे. राज्यांच्या मदतीने ही योजना राबविल्याने त्या त्या भागात येणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी सज्ज असलेली प्रशिक्षित तरुणपिढी तयार होईल. त्यामुळे जेव्हा नौसर्गिक आपत्ती व अन्य संकटे येतील तेव्हा मदत व बचाव कार्यासाठी मोठी प्रशिक्षित फौज तयार असेल.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*