विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली ः पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहीद अफ्रिदीने पुन्हा एकदा भारतविरोधी वक्तव्य करुन चर्चेत राहण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय क्रिकेट संघावर पाकिस्तानने इतकी दादागिरी केली की भारतीय खेळाडू आमच्याकडे माफी मागत असत, असा दावा अफ्रिदीने केला आहे.
भारताविरुद्ध 67 एकदिवसीय सामने खेळणाऱ्या अफ्रिदीने 1 हजार 524 धावा काढल्या तर आठ कसोटी सामन्यांमध्ये त्याला 709 धावा जमवता आल्या. ”भारताविरोधात खेळताना मी नेहमीच उत्तेजित होत असे. माझ्या आयुष्यातील सर्वाधिक आनंद देणारे क्रिकेट मी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांविरोधात खेळलो,” असे अफ्रिदीने सांगितले.
भारताविरुद्ध खेळणे मी नेहमीच पसंत केले, असे अफ्रिदी म्हणाला. ”उन्हे तो ठीक-ठाक मारा है हमने. इतना मारा है की उन्ही के मॅच के बाद माफीयॉं मांगी है उन्होने,” अशी फुशारकीही अफ्रिदीने मारली. भारत आणि ऑस्ट्रेलिया हे मोठे संघ होते. त्यांच्या विरोधात कामगिरी उंचावणे ही मोठी गोष्ट होती, असे तो म्हणाला. यु ट्यूबवरील एका शोमध्ये तो बोलत होता.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या एकूण एकदिवसीय सामन्यांपैकी 73 सामने पाकिस्तानने जिंकले तर 55 सामने भारताने जिंकले आहेत. मात्र पाकिस्तानचे यश हे प्रामुख्याने 80-90 च्या दशकातील आहे. त्या दशकात दोन्ही देशांमध्ये झालेल्या 30 पैकी 19 सामन्यांमध्ये पाकिस्तान विजयी झाला तर भारताला जेमतेम 9 सामने जिंकता आले. नव्वदच्या दशकात भारत-पाकिस्तान यांच्यात 48 सामने झाले. यापैकी 28 सामने पाकिस्तानने तर 18 सामने भारताने जिंकले.
2000 च्या दशकात मात्र भारताने थोडी आघाडी घेतली. या दशकात भारताने पाकिस्तानला 25 वेळा हरवले तर पाकिस्तानला 23 सामन्यांमध्ये विजय मिळवता आला. सन 2010 च्या दशकात ही दरी आणखी वाढली. भारताने 10 सामने जिंकले, पाकला 4 जिंकता आले. एकदिवसीय विश्वचषक सामन्यांमध्ये मात्र भारताने नेहमीच पाकिस्तानला मात दिली.
भारताविरोधात 1999 मध्ये चेन्नई कसोटीत काढलेले शतक हे कारकिर्दीतले सर्वोत्तम असल्याचे अफ्रिदीने सांगितले. “माझे सर्वात संस्मरणीय कसोटी शतक म्हणजे भारताविरुद्ध फटकावलेल्या 141 धावा होय. तेही भारतात जाऊन. सुरवातीला माझी या दौऱ्यासाठी निवड झालेली नव्हती. पण वासीम अक्रम आणि निवडसमितीच्या प्रमुखांनी माझ्या नावाचा आग्रह धरला होता. माझ्यासाठी तो दौरा खडतर होता. त्यामुळे ती इनिंग माझ्यासाठी महत्वाची होती,” असे अफ्रिदी म्हणाला.