उत्तम गुणवत्ता असलेले शिक्षण देशातच, वाचतील परदेशातील शिक्षणावर खर्च होणारे एक ते दीड लाख कोटी

जगात शिकायला गेलेले भारतीय विद्यार्थी मायदेशी परतण्याचे प्रमाण कमी आहे. परदेशी शिकण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचे एक ते दीड लाख कोटी रुपये शिक्षणावर दरवर्षी खर्च होतो. पैसा व प्रतिभा दोन्हींची गुंतवणूक देशाबाहेर होते. उत्तम गुणवत्ता असलेले शिक्षण भारतातच मिळेल, याची ग्वाही विद्यार्थ्यांना दिली पाहिजे, असे मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी स्पष्ट केले.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : जगात शिकायला गेलेले भारतीय विद्यार्थी मायदेशी परतण्याचे प्रमाण कमी आहे. परदेशी शिकण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचे एक ते दीड लाख कोटी रुपये शिक्षणावर दरवर्षी खर्च होतो. पैसा व प्रतिभा दोन्हींची गुंतवणूक देशाबाहेर होते. उत्तम गुणवत्ता असलेले शिक्षण भारतातच मिळेल, याची ग्वाही विद्यार्थ्यांना दिली पाहिजे. परदेशी विद्यापीठ आपल्या अटींवर भारतात येतील. अभ्यासक्रम, शिक्षणपद्धती, शिक्षक भारताच्या गरजेनुसार असतील, परदेशी विद्यापीठांच्या नव्हे, असे मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी स्पष्ट केले.

नव्या शैक्षणिक धोरणावर आयोजित वेबिनारमध्ये पहिल्यांदा पोखरीयाल यांनी जाहीर संवाद साधला. नव्या शैक्षणिक धोरणात सरसकट एका निर्णयाने शैक्षणिक संस्थांना स्वायत्तता दिली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पोखरीयाल म्हणाले की, टप्प्याटप्प्याने गुणवत्ता विकसन व त्यानंतर स्वायत्तता ही संकल्पना धोरणात आहे. त्यामुळे शैक्षणिक संस्थांनी गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावेत, स्वायत्ततेसाठी नाही असे सांगून पोखरियाल म्हणाले, देशात ३५ हजार महाविद्यालयांपैकी ८ हजार स्वायत्त आहेत. प्रत्येक महाविद्यालय, शैक्षणिक संस्था (इज्युकेशनल इन्स्टिट्युटशन) गुणवत्ता वाढवून नॅकच्या स्पर्धेत उतरल्यावरच टप्प्याटप्प्याने स्वायत्तता मिळेल.

पोखरीयाल यांनी सांगितले की, मातृभाषेतून शिक्षण म्हणजे इंग्रजीला किंवा कोणत्याही विदेशी भाषेला विरोध असे नाही. कोणत्याही विषयाचे आकलन मातृभाषेत सहजपणे होते. मातृभाषेचा आग्रह धरताना आम्ही देशभरातून तज्ज्ञांचे मत जाणून घेतले. ९९ टक्के लोकांनी या निर्णयाचे समर्थन केले. कोणताही विकसित देश घ्या, तेथे मातृभाषेतून शिक्षण घेवून लोकांचा विकास झाला. इंग्रजीकडे केवळ एक विषय (भाषा) म्हणूनच बघितले पाहिजे.

गुणवत्ता उत्तम असलेली जागतिक विद्यापीठच भारतात येतील. मुलांना मार्कांच्या रेसमध्ये गुंतवायचे नाही. आता रिपोर्ट कार्ड नव्हे तर प्रोग्रेस कार्ड असेल. विद्यार्थ्यांनाच स्वत:चे मूल्यांकन करता येईल. त्याचे शिक्षक, सोबत शिकणाऱ्यांचाही समावेश असेल, असे पोखरियाल म्हणाले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*