‘इमॅच्यूअर’ होता, मग खासदारकीची उमेदवारी का दिली? नेटकऱ्यांचा शरद पवार यांना सवाल!

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांना इमॅच्यूअर (अपरिपक्व) असल्याचे म्हटले आहे. यावरुन मावळ मतदारसंघातील पार्थ पवार यांच्या उमेदवारीचा विषय पुन्हा सुरू झाला आहे. अपरिपक्व होता मग मावळ मतदारसंघातून खासदारकीची उमेदवारी पार्थला का दिली, मतदारांना तुम्ही गृहीत धरता का असा सवाल नेटकऱ्यांनी शरद पवार यांना केला आहे.


विशेष प्रतिनिधी

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांना इमॅच्यूअर (अपरिपक्व) असल्याचे म्हटले आहे. यावर मावळ मतदारसंघातील पार्थ पवार यांच्या उमेदवारीचा विषय पुन्हा सुरू झाला आहे. अपरिपक्व होता मग खासदारकीची उमेदवारी का दिली, असा सवाल नेटकऱ्यांनी शरद पवार यांना केला आहे.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी करावी अशी मागणी पार्थ पवार यांनी गृह मंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली होती. यावर बोलताना पार्थ पवार यांच्या मागणीला आपण कवडीचीही किंमत देत नाही. ते इमॅच्यूअर आहेत, अशी टीका शरद पवार यांनी केली आहे. यावरून मावळ लोकसभा मतदारसंघातील पार्थ पवार यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहेत.

पार्थ पवारांना तिकीट देऊन तरूण नेतृत्वाची फळी तयार करत आहोत. नवखे नेतृत्व घडताना ठेच लागली तरी चालेल पण त्यातून ते शिकतील आणि भविष्यासाठी मावळ मतदार पार्थ पवारांना निवडून बदल घडवून आणतील असा विश्वास वाटतो, असे तुम्ही म्हणाला होतात. मग आता अचानक तुम्हाला पार्थ इमॅच्यूअर कसे वाटू लागले. तुम्ही मावळच्या जनतेवर त्यांना लादण्याचा प्रयत्न का केला, अशी विचारणा पवारांना करण्यात आली आहे.

माढा लोकसभा मतदारसंघात लढायचे नाही म्हणूनच इमॅच्यूअर पार्थचा मावळमध्ये बळी दिला का? असा सवाल एकाने केला आहे. अजित पवारांनी असे काय ब्लॅकमेल केले की तुम्हाला इमॅच्यूअर पार्थची उमेदवारी मान्य करावी लागली, असा सवाल नेटकऱ्यांनी केला आहे.

पार्थला ठेच लागली तरी चालेल असे तुम्ही निवडणुकीत म्हणाला होतात. आता तशीच ठेच त्याला दिली आहे का? असे एकाने विचारले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये लोकसभा निवडणुकीच्या काळात तुमचे चालत नव्हते का? त्यामुळे पार्थची उमेदवारी मान्य केली का? अशीही विचारणा पवारांना करण्यात आली आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*