इंदिराजींचे विश्वासू ते मोदींचे मार्गदर्शक; प्रणवदांचा संपन्न राजकीय प्रवास

 • पंतप्रधान इंदिरा गांधींचे विश्वासू ते पंतप्रधान नरेंद्र मोदींचे दिल्लीतले मार्गदर्शक असा प्रणवदांचा संपन्न राजकीय प्रवास राहिला आहे.

विशेष प्रतिनिधी 

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा जन्म ११ डिसेंबर १९३५ रोजी पश्चिम बंगालमधील बिरभूम येथे झाला. पाच दशकांहून अधिक त्यांची राजकीय कारकीर्द आहे. प्रणव मुखर्जी यांनी २०१२ ते २०१७ पर्यंत राष्ट्रपती पद भूषवले होते. ते देशाचे तेरावे राष्ट्रपती होते.

 

२५ जुलै २०१२ ला राष्ट्रपतीपदाची घेतली शपथ घेतली होती. १९८२ पासून कायम केंद्रीय राजकारणात राहिलेल्या प्रणवदांनी परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री, वाणिज्य मंत्री आणि अर्थमंत्री म्हणूनही काम पाहिले होते. इंदिराजींच्या मंत्रिमंडळातील ते तरूण सदस्य होते. मागील पिढीतील यशवंतराव चव्हाण, स्वर्णसिंग, बाबू जगजीवन राम यांना बाजूला सारत प्रणवदांना वयाच्या ४५ व्या वर्षी इंदिराजींनी अत्यंत विश्वासाने अर्थमंत्रीपद दिले. आर्थिक शिस्तीला प्रणवदांनी प्राधान्य दिले होते. डॉ. मनमोहन सिंग त्यावेळी रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर होते.

 

इंदिराजींच्या हत्येनंतर काँग्रेसमध्ये नेतृत्व प्रणवदांकडे येणे अपेक्षित होते. पण त्यावेळी कोलकत्यात असलेले प्रणवदा यांना दिल्लीतील “घडामोडींमुळे” संधी देण्यात आली नाही. काँग्रेस “कोटरीने” राजीव गांधींना पंतप्रधान केले. प्रणवदांना बाजूला करण्यात आले.

 

राजीव गांधींच्या रोषामुळे सुमारे पाच वर्षे प्रणवदांना राजकीय विजनवास सहन करावा लागला. राजीव गांधींच्या हत्येनंतर पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी प्रणवदांचे राजकीय पुनर्वसन केले. त्यांना नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष केले. नंतर वाणिज्य मंत्रीही केले. या काळानंतर प्रणवदांनी काँग्रेस संस्कृतीनुसार काँग्रेसच्या नेतृत्वाशी राजकीयदृष्ट्या जमवून घेतले.

२००४ मध्ये यूपीए सरकार आल्यानंतर प्रणवदांना पंतप्रधानपद मिळण्याची अटकळ बांधली जात होती. परंतु, सोनिया गांधी या राजीव गांधींचा प्रणवदांवरचा रोष विसरल्या नाहीत. त्यांनी डॉ. मनमोहन सिंग यांची पंतप्रधान म्हणून निवड केली. त्यावेळी प्रणवदांना दोन नंबरचे पद मिळाले पण त्यावेळी त़्यांना अर्थखाते देण्यात आले नाही. प्रणवदांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्याशी उत्तम जुळवून घेतले. त्यांनी काँग्रेस संस्कृतीप्रमाणे गांधी घराण्याचे लांगुलचालन केले नाही. पण गांधी घराण्याशी त्यांनी “राजकीय पंगा” घेणे टाळले.

 

२००९ नंतर यूपीए २ च्या कारकिर्दीत प्रणवदांवर एक कामगिरी सोपविण्यात आली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थी जपानच्या रेंकोजी मंदिरात ठेवण्यात आल्याचे मान्य करून त्या स्वीकाराव्यात यासाठी त्यांनी सुभाषबाबूंच्या पत्नी एमिली शेंकेल यांना convince करण्याचा प्रयत्न केला. सुभाषबाबूंच्या मृत्यूसंबंधीचा वाद मिटविण्यासाठी त्यांना ही भेट घेण्यासाठी सांगण्यात आले होते. २०१२ मध्ये त्यांना यूपीएने सन्मानाने राष्ट्रपती केले. डॉ. मनमोहन सिंग मंत्रिमंडळातील सहकारी आणि नंतर राष्ट्रपती या दोन्ही भूमिकांमध्ये प्रणवदांनी कामाचा ठसा उमटवला.

 

२०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर भारताचा राजकीय पट बदलला. या राजकीय पटावर देखील प्रणवदांनी उत्तम भूमिका वठवली. नरेंद्र मोदींना “दिल्ली” समजावून सांगत त्यांना दिल्लीत establish करण्याचे काम प्रणवदांनी केले. दिल्लीचे राजकीय ताणेबाणे प्रणवदांनी मोदींना सांगितले. मोदींनी याबद्दल त्यांना कायमच सन्मान दिला.

 

नव्या राजकीय पटावर नव्या भूमिकेत प्रणवदांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग मुख्यालयाला भेट दिली. संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या जन्म स्मारकात जाऊन त्यांना आदरांजली अर्पण केली.

 

संघाच्या कार्यक्रमात भाषण करताना त्यांनी काँग्रेस – गांधी – नेहरू विचारांचाच पुरस्कार केला. संघाविषयीचे “राजकीय दूरीकरण” त्यांनी स्वीकारले नाही. काँग्रेसमधून झालेली टीका सहन केली. आपले विचार संघाच्या व्यासपीठावर येऊन मांडणारे ते पहिले माजी राष्ट्रपती ठरले. मोदी सरकारने त्यांचा भारतरत्न देऊन गौरव केला.

प्रणवदांनी इतिहास, राज्यशास्त्र, कायदा या क्षेत्रातलं पद्व्युत्तर शिक्षण घेतले होते. प्रणवदांचे आत्मचरित्र खूप गाजले.

 

प्रणव मुखर्जींची कारकीर्द

 •  आय एम एफ, वर्ल्ड बॅंक, एशियन डेव्हलपमेंट बॅंकेच्या संचालक मंडळातही होते
 •  भारतीय अर्थव्यवस्थेवर अनेक पुस्तकांचं लेखन
 •  2008 मध्ये पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मान
 •  1969 पासून पाच वेळा राज्यसभेत तर 2004 पासून दोनदा लोकसभेवर निवड
 •  23 वर्ष कॉंग्रेस कार्यकारिणीत सदस्य
 •  अमोघ वक्तृत्वाची देण
 •  गाडगीळ मुखर्जी फॉर्म्युलाचे संस्थापक
 •  1982 मध्ये इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्रीपदाचा पदभार
 •  1980 ते 1985 पर्यंत राज्यसभेत
 •  1991 से 1996 पर्यंत योजना आयोगाचे उपाध्यक्ष
 •  1993 से 1995 पर्यंत वाणिज्य मंत्री
 •  1995 ते 1996 पर्यंत परराष्ट्र मंत्री
 •  2004 से 2006 पर्यंत संरक्षण मंत्री
 •  2006 ते 2009 पर्यंत परराष्ट्र मंत्री
 •  2009 से 2012 पर्यंत अर्थमंत्री
 •  2012 ते 2017 पर्यंत राष्ट्रपती

  Leave Your Comment

  Your email address will not be published.*