आयुक्तांची बदली करण्याऐवजी एकनाथ शिंदे-आव्हाडांची मंत्रीपदे काढा


भाजप आणि मनसे झाली आक्रमक -सत्ताधार्‍यांचे अपयश झाकण्यासाठी बदलले आयुक्तांना


विशेष प्रतिनिधी

ठाणे : ठाणे महापालिकेचे आयुक्त विजय सिंघल यांच्या बदलीवरुन राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. सत्ताधार्‍यांचे अपयश झाकण्यासाठी सरकारने आयुक्तांची बदली केली असल्याचा आरोप भाजप आणि मनसेने केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. या जिल्ह्यातले दोन क्याबिनेट मंत्री एकनाथ शिंदे (शिवसेना) आणि जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी) या दोघांचेही प्रशासकीय अपयश यास कारणीभूत आहे, असा आरोप भाजप-मनसे या दोन्ही पक्षांनी केला आहे. या दोघांनी याची जबाबदारी स्विकारावी. या दोघांचीही मंत्रीपदे काढावीत असे या दोन्ही पक्षांचे म्हणणे आहे.

ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर आणि मिराभाईंदर महापालिकेच्या आयुक्तांची सरकारने तडकाफडकी बदली केली आहे. ठाणे महापालिकेचे आयुक्त विजय सिंघल यांचीही रात्री उशिरा बदली करण्यात आली. कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत या सगळ्या बदल्या केल्या गेल्या आहेत.

कोरोना बाधीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने मुंबईत आयुक्त बदललेत तर मग ठाण्यात पालकमंत्री बदलणार का, असा प्रश्न भाजपा नेते आशिष शेलार यांनी केला. “ठाण्याचे पालकमंत्रीपद शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ठाणे जिल्ह्यातले आहेत. यांना मोकळे का सोडले,” अशी टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष व आमदार निरंजन वसंत डावखरे यांनी ट्विटद्वारे केली आहे.

ठाणो महापालिकेचे आयुक्त विजय सिंघल यांची अवघ्या 3 महिने 3 दिवसांत ठाण्यातून बदली करण्यात आली. ठाण्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आयुक्तांना जबाबदार धरण्यात आले. परंतु त्यांच्या बरोबर शिंदे आणि आव्हाड हेही तितकेच जबाबदार असल्याचा आरोप डावखरे यांनी केला.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी-पाचपाखाडी या मतदारसंघात तर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कळवा-मुंब्रा मतदारसंघात कोरोनाचे रुग्ण प्रचंड संख्येने वाढत आहेत. मुंब्र्यातल्या मृतांची नोंद महापालिकेकडून मुद्दाम कमी केली जाते. स्वत:च्या मतदारसंघात कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यात दोन्ही मंत्री अपयशी ठरले. मात्र, त्यांना महाविकास आघाडी सरकारने अभय का दिले असा सवालही डावखरे यांनी उपस्थित केला आहे.

दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील नगरसेवक नारायण पवार यांनी देखील दोन्ही मंत्र्यांवर टीका केली आहे. पालिकेला दोष देतांना या दोन्ही मंत्र्यांचीही जबाबदारी तितकीच महत्वाची होती. परंतु आपले अपयश झाकण्यासाठीच आयुक्तांची बदली करण्यात आल्याचा आरोप पवारांनी केला. महापालिकेतील काही विशिष्ट अधिकार्यांच्या लॉबीच्या हितसंबंधांचा फटका सिंघल यांना बसल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.

भाजप पाठोपाठ मनसेने देखील सत्ताधार्‍यांवर चांगले तोंडसुख घेतले आहे. “आयुक्तांच्या बदलीआड आपले अपयश झाकण्याचा सत्तधाऱ्यांचा प्रयत्न असल्याची टीका मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केली. जिल्ह्यातील चार आयुक्तांच्या मंगळवारी बदल्या करण्यात आल्या. सरकार फेल झाल्याने कोणाच्या तरी माथी हे अपयश मारायचे म्हणून या चार बदल्या केल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. आयुक्त अपयशी ठरत असेल तर संपूर्ण प्रशासन त्याला जबाबदार असते. याला जबाबदार धरुन ठाण्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री शिंदे यांचाही मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा अशी मागणी त्यांनी केली.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था