आमदारांच्या नियुक्तीपेक्षा राज्यातील रुग्णांची काळजी करा, फडणवीस यांचा संजय राऊत यांना टोला

राज्यातील जनतेपेक्षा बारा आमदारांची नियुक्ती कशी होईल याची शिवसेना नेते संजय राऊत यांना काळजी आहे. त्यांनी  त्यापेक्षा राज्यातील चीनी व्हायरसच्या रुग्णांची काळजी घ्यावी. रुग्ण लवकरात लवकर कसे बरे होतील, हे पाहावे असा टोला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.


विशेष प्रतिनिधी 

ठाणे: राज्यातील जनतेपेक्षा बारा आमदारांची नियुक्ती कशी होईल याची शिवसेना नेते संजय राऊत यांना काळजी आहे. त्यांनी  त्यापेक्षा राज्यातील चीनी व्हायरसच्या रुग्णांची काळजी घ्यावी. रुग्ण लवकरात लवकर कसे बरे होतील, हे पाहावे असा टोला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीवरून सध्या राजकारण सुरू आहे. यावर महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळेच राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची विधानपरिषदेवर नियुक्ती केली जात नाही, असा आरोप राऊत यांनी केला होता. त्याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले.  संजय राऊत यांनी १२ आमदारांची काळजी करू नये. महाराष्ट्राची काळजी करावी. कोविड रुग्णांची काळजी करावी. ज्यांना उपचार मिळत नाहीत, अशा कोविड रुग्णांचं काय होणार असा सवाल त्यांनी केला असता तर मला अधिक आनंद झाला असता.

ठाणे महानगर पालिका क्षेत्रातील परिस्थितीची पाहणी  फडणवीस यांनी केली.  यावेळी बोलताना ते म्हणाले,  मुंबईजवळील ठाणे, भिवंडी, उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील चीनी व्हायरसच्या रुग्णांच्या टेस्टची संख्या वाढवली पाहिजे. टेस्टिंग कमी होत असल्याने रोगाचा  फैलाव झाला आहे.  वैद्यकीय व्यवस्थेत सुधारणेची गरज आहे. रुग्णाचा स्वॅब घेतल्यानंतर चार दिवसांनी  अहवाल येतो. त्यामुळे त्याच्यावर उपचार करण्यासाठी उशिर होतो. दरम्यानच्या काळात त्याच्याकडून इतरांना लागण होते. त्यामुळे २४ तासांच्या आत रिपोर्ट आलाच पाहिजे, अशी व्यवस्था करायला हवी.

नवी मुंबई आणि ठाणे वगळता इतर पालिकांची आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यामुळे या पालिकांना उत्तम आरोग्य व्यवस्था निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने मदत करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*