आत्मचिंतन करण्यास सांगणे म्हणजे बंडखोरी असेल तर होय आम्ही केली, आनंद शर्मा यांचा पलटवार

कॉंग्रेस आजच्याइतकी कमजोर कधीच नव्हती. त्यामुळेच पक्षाच्या स्थितीवर आत्मचिंतन करण्यास सांगणे म्हणजे बंडखोरी असेल तर होय, ती आम्ही केली आहे, अशा शब्दांत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी पुन्हा एकदा विद्रोहाची भाषा सुरू केली आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कॉंग्रेस आजच्याइतकी कमजोर कधीच नव्हती. त्यामुळेच पक्षाच्या स्थितीवर आत्मचिंतन करण्यास सांगणे म्हणजे बंडखोरी असेल तर होय, ती आम्ही केली आहे, अशा शब्दांत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी पुन्हा एकदा विद्रोहाची भाषा सुरू केली आहे.

कॉंग्रेसमधील २३ ज्येष्ठ नेत्यांनी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षसंघटनेत बदल करण्यात सुचविले होते. मात्र, या पत्राचा खरा हेतू राहुल गांधी यांना पुन्हा अध्यक्षपदापासून रोखण्याचा होता. राहुल गांधी यांना अध्यक्षपदी नेमल्यास कॉंग्रेसला पुन्हा उभारी मिळणार नाही, असे त्यांनी सुचविले होते. यामुळे कॉंग्रेसमध्ये भूकंप झाला होता.

याबाबत बोलताना शर्मा म्हणाले, कॉंग्रेसच्या बैठकीत प्रश्न विचारणाऱ्या नेत्यांना पध्दतशीरपणे गप्प बसविण्यात आले. आज ज्या पध्दतीने कॉंग्रेस विखुरलेली आहे, त्यामुळे अनिश्चिततेचे वातावरण आहे. यामुळे आम्ही सर्वच जण चिंतीत आहोत. कॉंग्रेस १३५ वर्षे जुनी संघटना आहे. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात दर वर्षी कॉंग्रेसचा अध्यक्ष निवडला जात असे. पण आज मात्र निवडणुका होत नाहीत. संघटनेकडे लक्ष दिले गेले नाही.

२०१४ च्या निवडणुकांत साडेदहा कोटी तर २०१९ च्या निवडणुकीत आठ कोटी नवीन मतदार आले. २००९ मध्ये कॉंग्रेसला ११.९२ कोटी तर भारतीय जनता पक्षाला ७.८४ कोटी मते मिळाले होती. परंतु, २०१४ च्या निवडणुकीत कॉँग्रेसची मते १०.६० कोटी झाली. याचा अर्थ १.२३ कोटी मते कमी झाली. याच वेळी भारतीय जनता पक्षाची मते १७.६० कोटीवर गेली.

शर्मा म्हणाले, २०१९ मध्ये भाजपाची मते २२.९४ कोटी तर कॉंग्रेसची मते ११.९४ कोटी होती. इतकी कमजोर कॉंग्रेस कधीच नव्हती. या काळात आम्ही जर काही केले नाही तर पक्षाला न्याय देऊ शकणार नाही. त्यामुळे कॉंग्रेस टिकविण्यासाठी आत्मचिंतन गरजेचे आहे. मात्र, २०१९ नंतर १५ महिने झाले तरी कोणतेही आत्मचिंतन झाले नाही. सध्या हा शब्द बदनाम करण्यात आला आहे. आम्ही केडर बेस पक्ष नाही.

आमचा आधार युवक आणि विद्यार्थी संघटनांमुळे वाढत होता. पूर्वी येथे गुणवत्ता आणि एकमताने लोक येत होते. आता तेथे निवडणुका होतात परंतु त्यामध्ये पैसा आणि घराणेशाहीचाच बोलबाला असतो. बड्या नेत्यांच्या मुला-मुलींचा आणि पैशेवाल्यांचा संघटनेवर कब्जा आहे. त्यामुळेच कॉंग्रेसच्या घटनेचे पालन व्हायला हवे, अशी व्यथा शर्मा यांनी मांडली.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*