- असोचेमची ग्वाही; काँग्रेसची दिवाळखोरी
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : अर्थव्यवस्थेचा सर्वांत वाईट काळ संपला. देशातली मागणी वाढली की अर्थव्यवस्था सुधारेल, अशी खात्री असोचेम सारखी मोठी उद्योग संघटना देत असताना काँग्रेसने मात्र जीडीपीच्या निधनाबद्दल शोकसभा भरविण्याचा स्टंट केला आहे.
व्यक्तीच्या निधनानंतर सभ्य समाजात शोकसभा भरवली जाते. पण, देशाच्या जीडीपीत तिमाहीत घसरण दिसली म्हणून काँग्रेस नेत्यांनी सगळे संपले अशा थाटात अाग्र्यामध्ये शोकसभाच भरवली. ऑगस्टमध्ये आलेल्या जीडीपीच्या घसरणीच्या आकड्याला काँग्रेस नेत्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
एकीकडे असोचेमचे अध्यक्ष निरंजन हिरानंदानी अर्थव्यवस्था सुधारणेच्या दिशेने निघाल्याची हमी देताहेत. प्रत्येक अनलॉकनंतर मागणी वाढतेय. त्यातून अर्थव्यवस्थेत पैसा खेळायला लागलाय. वर्क फ्रॉम होमचा रिअल इस्टेटवर सकारात्मक परिणाम होईल, अशी ग्वाही हिरानंदानी यांनी दिली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस नेते जीडीपीच्या निधनाची शोकसभा घेऊन काँग्रेसच्या दिवाळखोरी मनोवृत्तीचे प्रदर्शन घडवत आहेत.
शोकसभेला उपस्थित असलेल्या काँग्रेस नेत्यानं सांगितलं,”देशाच्या मेलेल्या जीडीपीसाठी शोकसभा आयोजित केली आहे. २०२०-२१च्या पहिल्या तिमाहीत जीडीपीची वाढ उणे २३.९% वर घसरला आहे. जगभरातील इतर सर्व मोठ्या अर्थव्यवस्थामधील ही सर्वात निचांकी आहे,” असं काँग्रेस नेत्यानं सांगितलं.
राम टंडन म्हणाले, “नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारच्या काळात जीडीपीची सतत होणारी घसरण हे भारतासाठी एक डाग आहे,” असं त्यांनी सांगितलं. सध्याच्या आर्थिक परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याबद्दलही टंडन यांनी मोदी सरकारला दोषी ठरवलं.
“माणसाचा मृत्यू झाल्यानंतर ज्याप्रमाणे शोक व्यक्त केला जातो, त्याचप्रमाणे काँग्रेसने हा उठावणा (शोकसभा) आयोजित केली आहे. कारण मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाचा जीडीपी मृत पावला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये देशाचा जीडीपी कमी होत असला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं त्याकडे लक्ष दिलं नाही” असा आरोपही टंडन यांनी केला. यावेळी अनेक काँग्रेस नेत्यांनी जीडीपीच्या पोस्टर समोर पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. त्याचबरोबर दोन मिनिटं स्तब्ध राहून शोक व्यक्त करण्यात आला.