अयोध्येला जाता आले नाही याची हुरहुर..फडणवीस यांनी उलगडला तीनही कारसेवांचा प्रवास


माझ्यासारख्या ज्या व्यक्तीने सगळ्या कारसेवांत भाग घेतला त्याच्यासाठी पाच ऑगस्टचा दिवस प्रचंड आनंदाचा आहे. मात्र, हुरहुरही आहे की आपल्याला जाता येत नाही. पण अयोध्येला जाता आले असते तर स्वर्णिम दिवस असता अशी काहीशी खंत व्यक्त करीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी आपल्या तीनही कारसेवांचा आनंद उलगडला.


विशेष प्रतिनिधी 

पुणे : माझ्यासारख्या ज्या व्यक्तीने सगळ्या कारसेवांत भाग घेतला त्याच्यासाठी पाच ऑगस्टचा दिवस प्रचंड आनंदाचा आहे. मात्र, हुरहुरही आहे की आपल्याला जाता येत नाही. अयोध्येला जाता आले असते तर स्वर्णिम दिवस नसता, अशी काहीशी खंत व्यक्त करीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी आपल्या तीनही कारसेवांचा आनंद उलगडला.

अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या पूर्वसंध्येला एका दूरचित्रवाहिनीशी बोलताना फडणवीस म्हणाले, गुलामगिरीचे प्रतिक असलेला ढाचा तेथून हटवायचा आणि प्रभु रामचंद्राचे मंदिर बांधायचे हिच प्रत्येक कारसेवकाची इच्छा होती. त्यामुळे आमच्या सगळ्यांकरिता हा दिवस स्वप्नवत. याची देही याची डोळा राम मंदिराचे स्वप्न पूर्ण होणे यापेक्षा आनंद काय असतो शकतो?

आपल्या पहिल्या कारसेवेचा अनुभव सांगताना फडणवीस म्हणाले, विश्व हिंदू परिषदेने ठरविलेल्या शिलान्यासाच्या कार्यक्रमात मला एका खंड्याचे (विभाग) प्रमुख केले होते. त्यामध्ये ११ उपखंड होते. प्रत्येक उपखंडात मिरवणूक काढून राम शिलान्यास पूजन करून घेण्याचे काम माझ्याकडे होते. त्यावेळी मी १८ वर्षांचा होतो. ते काम मी नियोजनबध्दपणे करून घेतले आणि वेगळीच उर्जा मिळाली. मी राहायचो त्या भागात कॉँग्रेसचे एक मोठे नेते राहत होते. राणा प्रताप यांचे वंशज असलेल्या या नेत्यांकडे मी गेलो आणि त्यांना म्हणालो की राम शिलान्यासच्या कार्यक्रमाचे यजमान तुम्हाला व्हायचे आहे. ते तयार झाले. लोकांनी आपला पक्ष, जात, धर्म विसरून राम शिलान्यासमध्ये सहभाग घेतला.


पहिली कारसेवा ३० सप्टेंबर १९९० रोजी मी २० वर्षांचा असताना झाली. मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम करत होतो. आमचा सगळा जथ्था घेऊन पहिल्यांदा अलाहाबादला गेलो. तेथे देवराह बाबांच्या आश्रमात जायचे होते. सगळीकडे कर्फ्यू लागला होता. मीच सगळ्यात मोठा होतो. त्यामुळे पंडीत नेहरू यांचे निवासस्थान असलेल्या आनंदभुवन येथे बरोबर आलेल्या सगळ्यांना बसविले आणि आश्रम शोधायला गेलो.

महाराष्ट्रतील नेत्यांनी आम्हाला सांगितले की सगळे रस्ते बंद केले आहेत. त्यामुळे आता सगळ्या कारसेवकांनी सत्याग्रह करून अटक करून घ्यायची आहे. मात्र, मी सगळ्यांना सांगितले मला कसेही करून अयोध्येला पोहोचायचे आहे. तेथील लोकांकडे चौकशी केल्यावर त्यांनी सांगितले की शंकराचार्य पायी अयोध्येला जाणार आहेत. त्यांच्यासोबत तुम्ही जाऊ शकता. तेथे ओळखीचे कोणी नव्हते. चार-पाच दिवस राहायचे होते. त्यामुळे एका मंदिरात गेलो आणि सांगितले की आम्ही कारसेवक असून राहायला जागा नाही. त्यांनी राहण्याची परवानगी दिली. त्यांच्यासोबत भजन करायचो. ते खायला-प्यायला द्यायचे. आम्ही गच्चीवर झोपायचो. तीन अंश सेल्यीयस तापमान होते. आम्ही एकच ब्लॅँकेट घेऊन गेलेलो. त्यामुळे भयंकर थंडी वाजायची.

त्यानंतर शंकराचार्यांसोबत पायी निघालो. २५ किलोमीटरपर्यंत गेल्यावर एका पुलावर सगळ्यांना अडविले. सगळीकडून लाठीमार, फायरिंग सुरू झाले. खांद्यावरून, डोक्यावरून गोळ्या जात होत्या. दीड-दोन तास हे चालले होते. अनेक जण जखमी झाले. मग पोलीसांच्या गाड्या आल्या आणि ५०० किलोमीटर अंतरावरील बदायूनी येथील कारागृहात आम्हाला ठेवले. कारागृहातही आम्ही कैद्यांना श्रीराम म्हणायला लावायचो, भाषणे करायचे. तेथील जेलरची दोन्ही मुले कारसेवेला गेली होती. त्यामुळे त्यांनाही कारसेवकांबाबत प्रेम होते. सुटल्यानंतर नागपूरला पोहोचल्यावर घरचे वातावरण तंग होते. कारण अनेक दिवस गायब होतो.

६ डिसेंबर १९९२ रोजीच्या दुसऱ्या कारसेवेच्या वेळी मी महापालिकेत नगरसेवक होतो. माझा मोठा जथ्था घेऊन अयोध्येला गेलो होतो. अयोध्येत काळाराम मंदिरात राहिलो. दररोज शरयूत आंघोळ करायची, मंदिराचे दर्शन घ्यायचे असा आमचा कार्यक्रम सुरू होतो. ५ डिसेंबरला आम्हाला सांगण्यात आले की दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी एकत्रित होऊन कारसेवा करायची आहे. प्रत्येकाने एक मुठ माती टाकायची आहे. आम्ही त्याप्रमाणे शिस्तीत जमा झालो. भाषणे सुरू असताना लोकांनी धावाधाव सुरू केला. आम्हीही धावलो. सगळ्यांनी वादग्रस्त ढाचा तोडायला सुरूवात केली.

पहिला, दुसरा तुटला परंतु तिसरा तोडायला वेळ लागला. तिसरा ढाचा पडल्यावर लोकांमध्ये अविस्मरणिय असा आनंद पसरला. त्यावेळी कोणाच्याही मनात दुसऱ्या धर्माचे काही पाडत आहोत, अशी भावना नव्हती. प्रत्येकाच्या मनात एकच होते की आपल्या रामलल्लाचा जन्म येथे झाला, मंदिर येथेच होते. रात्री लगेच तेथे बांधकामाला सुरूवात झाली. आम्हीही तेथे थोडे काम केले. रातोरात तेथे कर्फ्यू लागला. पोलीसांनी आम्हाला बसमधून नेतो म्हणून सांगितले, पण एका ठिकाणी सोडून दिले. रास्ता रोको केल्यावर आम्हाला अलाहाबादला सोडण्यात आले. तेथून ट्रेनने निघालो. सतत हल्ले, प्रतिहल्ले व्हायचे. ट्रेन थांबविली जायची. शेवटी तीन दिवसांनी नागपूरला पोहोचलो.

तिसऱ्या कारसेवेच्या वेळी मी आमदार होतो. तरी आम्ही जनरल डब्यातून विनातिकिट जायचो. रेल्वे स्टेशनवरच झोपायचो. लखनऊच्या प्लॅटफॉर्मवर मी झोपलो होतो. तेथून दुसऱ्या दिवशी ट्रेनने निघालो. परंतु, ती थांबविल्याने ३० किलोमीटर पायी गेलो आणि कारसेवेत भाग घेतला.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती