अयोध्येच्या राम मंदिराचा पाया पुरातत्त्व पद्धतीने खोदा; १२ व्या शतकातील मंदिराची संरचना मिळेल; प्रसिद्ध पुरातत्त्वज्ञ के. के. महंमद यांचे प्रतिपादन

  • दिल्लीत २० ऑगस्टच्या बैठकीत ठरेल मंदिर बांधकामाचा रोडमॅप

वृत्तसंस्था

लखनौ : अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीचा पाया खोदताना प्राचीन इतिहासाची पाने उलगडण्याची शक्यता आहे. अयोध्येत राम जन्मभूमी स्थानाचा पाया पुरातत्त्व खात्याच्या पद्धतीनुसार खोदला तर १२ व्या शतकातील मंदिराची संररचना मिळू शकेल, असे प्रतिपादन प्रख्यात पुरातत्त्वज्ञ के. के. महंमद यांनी केले आहे.

महंमद म्हणाले, “तेथे सापडणाऱ्या अवशेषांना भावी पिढीसमोर ठेवता येईल. यामुळे त्यांना इतिहासाची माहिती व हे शास्त्र समजण्याची संधी मिळेल. जन्मस्थळाखाली सर्व पुरातत्त्वदृष्ट्या महत्त्वाची सामग्री समोर येण्याची शक्यता आहे. याचा उल्लेख २००३ च्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एएसआयच्या पथकाने आपल्या अहवालात केला आहे. पाया खोदताना १२ वे शतक व त्यापूर्वीच्या मंदिराप्रमाणे जन्मभूमीतून सापडलेल्या अवशेषांचे नव्या राम मंदिराच्या खाली संग्रहालय बनवून त्यात ठेवले जावेत. तरच संपूर्ण इतिहासासाठी हे मोठे यश ठरेल.”

एएसआयच्या या अहवालाचा उल्लेख सर्वोच्च न्यायालयाने ९ नोव्हेंबर २०१९ च्या आदेशात करताना म्हटले होते की, मशीद रिक्त जागेवर बांधण्यात आलेली नव्हती. एएसआयचे महासंचालक बी. बी. लाल यांनी १९७६ मध्ये पहिल्यांदा राम जन्मभूमीच्या पुरातत्त्व सर्वेक्षणाचा उल्लेख करताना म्हटले होते की, जन्मभूमीतून प्राचीन मंदिराचे अवशेष सापडले होते. जन्मभूमीचे सपाटीकरण सुरू असताना सापडलेल्या मंदिराच्या अवशेषानंतर त्यांचे म्हणणे खरे असल्याचे सिद्ध झाले. मार्च २०२० मध्ये सपाटीकरणात सापडलेले अवशेष महंमद यांनी ८ व्या शतकातील असल्याचे म्हटले होेते.

२० ऑगस्ट रोजी दिल्लीत बांधकाम समितीची बैठक

श्रीराम जन्मभूमी मंदिराचे विधिवत बांधकाम सुरू करण्यापूर्वी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची बैठक बांधकाम समितीच्या सदस्यांसमवेत २० ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता आहे. या बैठकीत बांधकाम समितीशी संबंधित सदस्यही असतील. बांधकाम समितीचे अध्यक्ष व माजी सनदी अधिकारी नृपेंद्र मिश्र आहेत. न्यास व संबधित बांधकाम समितीच्या या बैठकीत मंदिर बांधकामाची रूपरेषा ठरेल. विश्वस्तांतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीत पाया खोदण्यापासून बांधकाम सुरू करण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर चर्चा होणार आहे. बांधकाम पूर्ण करण्याचे वेळापत्रकही तयार होईल. मंदिराचे बांधकाम सुरू करण्यासाठी नकाशा मंजूर व्हायचा आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*