केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी चीनी व्हायरसच्या संकटात दिल्लीकरांसाठी अनुपम भेट दिली आहे. गृह आणि संरक्षण मंत्रालयांनी मिळून केवळ ११ दिवसांत दिल्लीमध्ये जगातील सर्वात मोठे १० हजार बेडचे हॉस्पीटल तयार करण्यात आले. यामुळे आता दिल्लीतील नागरिकांना वैद्यकीय उपचार उपलब्ध होऊ शकणार आहेत.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी चीनी व्हायरसच्या संकटात दिल्लीकरांसाठी अनुपम भेट दिली आहे. गृह आणि संरक्षण मंत्रालयांनी मिळून केवळ ११ दिवसांत दिल्लीमध्ये जगातील सर्वात मोठे १० हजार बेडचे हॉस्पीटल तयार करण्यात आले. यामुळे आता दिल्लीतील नागरिकांना वैद्यकीय उपचार उपलब्ध होऊ शकणार आहेत.
दिल्लीमध्ये चीनी व्हायरसचा प्रादुर्भाव वाढला आहे. पंधरा दिवसांपूर्वी तर दिल्लीतील स्थिती स्फोटक बनली होती. रुग्णांना हॉस्पीटलमध्ये बेड उपलब्ध होतील की नाही अशी शंका निर्माण झाली होती.
दिल्लीच्या सरकारने इतर राज्यांतील रुग्णांना हॉस्पीटल बंदी करण्याची तयारी केली होती. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अगदी हतबल झाले होते. या वेळी केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी दिल्लीची सूत्रे हाती घेतली. सातत्याने बैठका घेतल्या. विशेष म्हणजे यामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता त्यांनी केजरीवाल यांनाही सोबत घेतले. याच वेळी दिल्लीमध्ये हॉस्पीटलची व्यवस्था करण्यासाठी अमित शहा यांनी प्रयत्न सुरू केले आणि ११ दिवसांत त्याला प्रत्यक्ष रुपही दिले.
जगातील सर्वात मोठे कोव्हिड केअर सेंटर रविवारी सुरू करण्यात आले. कॅन्टोंमेंट परिसरात बनलेल्या या तात्पुरत्या सेंटरचे नाव सरदार वल्लभभाई पटेल कोव्हिड-19 हॉस्पीटल ठेवण्यात आले आहे. या हॉस्पीटलमध्ये 250 आयसीयू बेडसह 10 हजार बेड्स आहेत. गृह मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत त्याचे उद्घाटन झाले.
यावेळी राजनाथ सिंह म्हणाले की, डीआरडीओ, गृह मंत्रालय आणि टाटा सन्स अँड इंडस्ट्रीज सह अनेक संघटनांना सोबत घेत हे हॉस्पीटल तयार केले आहे. हे हॉस्पीटल वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनच्या निदेर्शांनुसार तयार करण्यात आले आहे. चीनी व्हायरसग्रस्त रुग्णांना चांगले उपचार देऊन आजारापासून वाचवत आहोत.