अंदमान-निकोबार बेटांना जलद दूरसंचार सेवा; मराठी भूमीपुत्राची यशस्वी कामगिरी


  • दूरसंचार संचालक विलास बुरडे यांनी पार पाडली महत्त्वपूर्ण जबाबदारी

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : स्वातंत्र्यतीर्थ अंदमान – निकोबार बेटांनाउर्वरित देशाप्रमाणे जलद दूरसंचार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी चेन्नई ते अंदमान व निकोबार दरम्यान २३०० किलोमीटर लांबीची सबमरीन ऑप्टीकल फायबर केबल समुद्रात टाकण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडीयो कॉन्फरन्सिंगव्दारे या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. हा प्रकल्प युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड (युएसओएफ) च्या देखरेखीत पूर्ण करण्यात आला आहे. या युएसओएफ चे संचालक विलास बुरडे आहेत. ते महाराष्ट्राचे असून त्यांनी मर्यादित वेळेत या प्रकल्पाची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडली .

सबमरीन केबल चेन्नई ते पोर्ट ब्लेअर आणि पोर्ट ब्लेअर ते स्वराज द्वीप (हॅवलॉक), लिटल अंदमान, कार निकोबार, कामोरता, ग्रेट निकोबार, लाँग आयलँड आणि रंगत या आठ द्वीपांना जोडली जाणार आहे. या जोडणीमुळे देशातील इतर भागांप्रमाणेच अंदमान आणि निकोबार बेटांवरही मोबाईल आणि लँडलाईन दूरध्वनी सेवा जलद आणि अधिक विश्वासार्ह होणार आहे.

चेन्नई ते पोर्ट ब्लेअर दरम्यान सबमरीन ओएफसी लिंक 2 x 200 जीबीपीएस प्रतिसेकंद बँडविड्थ असणार आहे. आणि पोर्ट ब्लेअर व इतर बेटांदरम्यान 2 x 100 जीबीपीएस असणार आहे. यामुळे टेलिकॉम आणि ब्रॉडबँड सुविधांची तरतूद करता येईल. आधी मिळत असलेल्या मर्यादित सेवांचे रूपांतर जलद गतीत होईल, 4 जी मोबाईल सेवांमध्ये मोठ्या सुधारणा दिसून येतील.

सुधारित टेलिकॉम आणि ब्रॉडबँड जोडणीमुळे बेटांवर पर्यटन व्यवसायाला अधिक प्रोत्साहन मिळेल. रोजगार वाढतील. अर्थव्यवस्थेला उभारी मिळेल आणि स्थानीक राहणीमानाचा दर्जा सुधारेल. चांगल्या कनेक्टिव्हिटीमुळे टेलिमेडिसीन आणि टेली-एज्युकेशन या ई-गव्हर्नन्सची अंमलबजावणी सुलभ होईल. लहान उद्योजकांना ई-कॉमर्समुळे संधी निर्माण होतील तर शैक्षणिक संस्था विस्तारीत बँडविडथचा वापर ई-लर्निंग आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी करतील.

विलास बुरडे यांची झेप

हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यामध्ये केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार विभागाच्या युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड (युएसओएफ) ने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. युएसओएफचे संचालक विलास बुरडे आहेत. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने युएसओएफ अंतर्गत दळणवळण मंत्रालयाच्या दूरसंचार खात्यामार्फत निधी पुरवला आहे. भारत संचार निगम लिमिटेडने हा प्रकल्प अंमलात आणला आहे तर टेलिकम्युनिकेशन्स कन्सलटन्टस इंडिया लिमिटेड प्रकल्पासाठी तांत्रिक सल्लागार कंपनी आहे. प्रकल्पासाठी १२२४ कोटी रुपये खर्च करुन सुमारे २३०० किलोमीटर सबमरीन ओएफसी केबल टाकण्यात आली आहे. प्रकल्पाचे काम नियोजित वेळेत पूर्ण झाले आहे.

विलास बुरडे सन १९९५ मध्ये भारतीय दूरसंचार सेवेत रूजू झाले. त्यांनी मुंबई, ठाणे, नाशिक आणि सुरत येथे विविध पदांवर महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडल्या. तसेच दूरसंचार खात्याला मोठया प्रमाणात मलसूलही गोळा करून दिला. २०१३ मध्ये ते दिल्लीत कर्मचारी निवड आयोगाचे (SSC) प्रादेशिक संचालक म्हणून प्रतिनियुक्तिवर आले. त्यांच्या कार्यकाळात जवळपास ३००० उमेदवार केंद्र शासनाच्या सेवेत रूजू झाले. बुरडे दिल्लीतील विविध मराठी संस्थांमध्ये ही सक्रीय असतात.

२०१६ मध्ये दूरसंचार विभागातील (युएसओएफ) च्या संचालक पदाचा पदभार श्री बुरडे यांनी स्वीकारला. त्यांच्याच कार्यकाळात अंदमान – निकोबारसाठी प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते ३० डिसेंबर २०१८ रोजी पोर्ट ब्लेअर येथे करण्यात आली. आता हा प्रकल्प पूर्ण होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकल्पाचे लोकार्पण होणे हा अभिमान क्षण असल्याची प्रतिक्रिया विलास बुरडे यांनी व्यक्त केली.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था