५०० वर्षांनंतरच्या ऐतिहासिक क्षणासाठी अयोध्यानगरी सजून – धजून सज्ज


  • सुरक्षाही कडक; अयोध्या सील; राम मंदिर भूमिपूजनासाठी 48 कॅमेऱ्यांसह 100 लोकांचे पथक लाइव्ह कव्हरेजसाठी सज्ज
  • योगींकडून पाहणी; प्रोटोकॉलचे कडक पालन; ज्यांना निमंत्रण त्यांनीच यावे
  • अभिजित मुहूर्तावर १२.३० वाजता भूमिपूजन; दीपोत्सवाचे राम की पौडीहून आज होणार थेट प्रक्षेपण

वृत्तसंस्था

अयोध्या : ५०० वर्षांनंतरच्या ऐतिहासिक क्षणासाठी इश्वाकू राजवंशाची राजधानी अयोध्या सजून – धजून तयार झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ ऑगस्टला राम मंदिराच्या पायाभरणीसाठी अयोध्येत ३ तास थांबतील. १२.३० वाजता भूमिपूजन सुरू होईल. ते बरोबर १० मिनिटे चालेल. त्यानंतर पंतप्रधान भूमिपूजन समारंभात सहभागी होतील. हा कार्यक्रम सव्वा तासाचा असेल. कडक सुरक्षेसाछी अयोध्या सील करण्यात आली.

पंतप्रधान तेथे पारिजातकाचे झाड लावतील. भूमिपूजन समारंभ देशात थेट प्रक्षेपणासाठी ४८ पेक्षा जास्त अत्याधुनिक कॅमेरे लावण्यात आले आहेत. हे कॅमेरे दूरदर्शन आणि एएनआयचे आहेत. दोघांच्या हायटेक एचडीओबी व्हॅन उपस्थित आहेत. दूरदर्शन व एएनआयचे १०० पेक्षा जास्त सदस्य परिसरात असतील. ४ ऑगस्टला अयोध्येत दीपोत्सव आणि दुसऱ्या कार्यक्रमासाठी दूरदर्शन व इतर टीव्ही वाहिन्यांच्या चार ओबी व्हॅन राम की पौडीत तीन दिवसांपासून आहेत.

जन्मभूमी परिसरातील मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत विशेष पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष नृत्यगोपाल दास, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असतील.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी जेव्हा अयोध्येत जवळपास ५०० वर्षांच्या परीक्षेच्या निकालासोबत भगवान श्रीरामाच्या भव्य मंदिराची पायाभरणी करतील तेव्हा अयोध्येसोबतच देश आणि जगासाठी हा एक ऐतिहासिक क्षण असेल. कोरोनामुळे प्रोटोकॉलचे पालन केले जाईल. ज्यांना आमंत्रण आहे, त्यांनीच येथे यावे. अभिजीत मुहूर्त असल्याने मंदिराच्या कामात कोणतीही अडचण येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

अयोध्या मार्गावर ठेवले जातील रंगीत घडे, आंब्याच्या पानांची सजावट करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सांस्कृतिक शाखा संस्कार भारती मातीचे ५१०० घडे सजवत आहे. त्यांना रंग, कपडे, गोटे, आंब्याची पाने आणि दिव्यांनी सजवले जात आहे. हे घडे साकेत महाविद्यालयाकडून जाणाऱ्या अयोध्या मार्गावर ठेवले जातील.

अभिजित हा श्रेष्ठ मुहूर्त, निर्विघ्नपणे, यशस्वीपणे पूर्ण होईल मंदिर निर्माण

राम मंदिर भूमिपूजनाचा मुहूर्त काढणारे गणेश्वरशास्त्रींनी सांगितले, अभिजित मुहूर्ताच्या १६ भागांत १५ अतिशुद्ध असतात. त्यात हे ३२ सेकंद महत्त्वाचे आहेत. बुधवार असल्याने मंदिर निर्मिती निर्विघ्नपणे पार पडेल.

१०४ कोटी रुपये खर्चून अयोध्या रेल्वेस्थानकाला राम मंदिराचा आकार

उत्तर रेल्वे अयोध्या रेल्वेस्थानकाला १०४ कोटी रुपये खर्चून भव्य राम मंदिराच्या रूपात तयार करेल. उत्तर रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव चौधरी यांनी सांगितले, स्थानकाच्या आत आणि बाहेरच्या परिसराचा विकास केला जाईल. तिकीट खिडक्यांची संख्या वाढवली जाईल. प्रतीक्षालय वातानुकूलित असेल आणि विश्रामगृहात पुरुषांसाठी १७ आणि महिलांसाठी १० जादा खाटा असतील. फुटओव्हर ब्रिज, फूड प्लाझा, दुकाने, पर्यटन केंद्र, ट‌ॅक्सी स्टँड, व्हीआयपी लाउंज अशा सुविधा उपलब्ध केल्या जातील.

मुख्य पुजारी सत्येंद्र दास म्हणाले

७-८ डिसेंबर १९९२ ला श्रीरामांना केवळ फळांचा नैवेद्य दाखवला होता. पण  दरम्यान, श्रीरामलल्लाचे मुख्य पुजारी आज अयोध्येचे सौंदर्य बघून जाणवते की, त्रेतायुगात देवाचे कसे स्वागत झाले असेल. रामाच्या नगरीचे वैभव बघून देवलोकही आनंदी होत असेल. जुन्या दिवसांची आठवण करत ते म्हणाले की, ७-८ डिसेंबर १९९२ चा दिवस विसरू शकत नाही, तेव्हा रामलल्लांना दोन दिवसांपेक्षा जास्त केवळ काही फळे व दुधाचा नैवेद्य दाखवता आला होता.

६ डिसेंबर १९९२ ला वाटले की सांगाडा वाचणार नाही, तेव्हा काही सहकाऱ्यांसोबत श्रीरामलल्लाचे सिंहासन बाहेर काढले. काही तासांतच सांगाडा कोसळला. गोंधळ झाला. काही मिळत नव्हते. मोठ्या मुश्किलीने काही फळे व दुधाची व्यवस्था करून संध्या आरती व नैवेद्य दाखवता आला. रात्रभर गोंधळ सुरू होता. मला मंगलारती करून सकाळी भोग चढवण्याची तयारी करायची होती. ती ६ व ७ डिसेंबरची रात्र होती. दोन सहकाऱ्यांना अयोध्येच्या बाजारातून सकाळी नैवेद्याच्या साहित्याची व्यवस्था करायला सांगितले. मंगलारती तर झाली.

नैवेद्य दाखववण्याची चिंता होती. साहित्य घेण्यासाठी गेलेले सहकारी यायला उशीर होत असल्याचे पाहून मला रडू कोसळले. सकाळी नैवेद्य दाखवतानाही अश्रू थांबत नव्हते. सकाळी नैवेद्य दाखवल्यांनतर संध्याकाळची चिंता वाटू लागली. कारसेवकांनी रामलल्लासाठी चबुतरा तयार करणे सुरू केले. सायंकाळपर्यंत चबुतरा बऱ्यापैकी झाला. कसा तरी सायंकाळी नैवेद्य दाखवून शयनारती करता आली. हे ८ डिसेंबरपर्यंत सुरू होते. ९ डिसेंबरला स्थिती सुधारली. नंतर सर्वोच्च न्यायालयाने पूजेची जबाबदारी रिसीव्हरला सोपवली.

अशी होती अयोध्या

वीर योद्धा : आवाज ऐकून अचूक निशाणा साधायचे
वाल्मीकि रामायणानुसार अयोध्यानगरीत असे वीर योद्धे होते, जे शब्दवेधी बाण चालवायचे. त्यांचा निशाणा अचूक होता. संबंधित दुसरा श्लोक- हिंसव्याघ्रवराहणं मतानां नदतां बने। हत्तारो निशितै: शस्तैर्वलाद्वाहुबलैरपि।। (तत्रैव, बालकांड, सर्ग ५, ओळ २२) आहे. याचा अर्थ आहे, हे शूरवीर वाघ, सिंहांना मारण्यात पूर्णपणे सक्षम होते.

नगर संरचना : सुरक्षेसाठी चारही बाजूंना खंदक होते.

महर्षी वाल्मीकी रामायणात अयोध्येबाबत लिहितात, येथे सुंदर बाजार व शहराच्या सुरक्षेसाठी हुशार कारागिरांनी बनवलेली यंत्रे व शस्त्रे ठेवली होती. चारही बाजूंना खोल दरी खोदली होती, त्यात प्रवेश करणे किंवा ते ओलांडणे अशक्य होते. हे शहर दुसऱ्यांसाठी पूर्णपणे दुर्गम व अजिंक्य होते. अयोध्येत सुंदर लांब, रुंद रस्ते होते.

धनधान्याने संपन्न व संतुष्ट होती प्रजा

अयोध्येतील वस्ती दाट होती. रामायणात येथील नागरिकांच्या सामाजिक व धार्मिक जीवनाचे आदर्श चित्रण बघायला मिळते. येथे राहणारी सर्व माणसे प्रसन्न, नि:स्वार्थी, धार्मिक, सत्यवादी व शुद्ध विचारांचे होते. ते त्यांना मिळालेल्या वस्तू व धनाबाबत समाधानी होते. रामायणानुसार येथे लोकांसह राजा दशरथ या शहरात त्याच प्रकारे राहायचे ज्या प्रकारे स्वर्गलोकात इंद्र राहत होते. काम, कर्तव्य व सेवेला पूर्णपणे समर्पित होते अयोध्यावासी.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था