अयोध्या तो झाँकी है; काशी – मथुरा बाकी है…!!; विनय कटियारांचा शंखनाद


विशेष प्रतिनिधी 

अयोध्या : बजरंग दलाचे सहसंस्थापक आणि भाजपचे राज्यसभेचे माजी सदस्य विनय कटियार हे राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यासाठी अयोध्येमध्ये दाखल झाले आहेत. राम मंदिर आंदोलनामधील महत्वाच्या नेत्यांपैकी एक असणारे कटियार हे त्यांच्या रोखठोक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. भाजपाचे फ्रायर ब्रॅण्ड नेता म्हणून ओळख असणाऱ्या कटियार यांनी आता अयोध्येनंतर काशी आणि मथुरेमधील मंदिरांसंदर्भात काम करणार असल्याचे म्हटले आहे.

“मी राम मंदिरासाठी अनेक आघाड्यांवर आंदोलनं केली आहेत. खूप मोठा संघर्ष केल्यानंतर आम्ही इथपर्यंत पोहचलो आहोत. मुलायम सिंह यादव यांच्या सांगण्यावरुन आंदोलकांवर गोळीबारही झाला पण आम्ही थांबलो नाही. याचे संपूर्ण श्रेय हे अनेक कोटी कार्यकर्ते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि साधू संतांना जाते,” असं कटियार यांनी सांगितलं आहे.

“माझा जन्मच अयोध्या, काशी आणि मथुरेसाठी”

नरेंद्र मोदी हे जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हापासून ते यासाठी प्रयत्न करत होते. ते या कार्यक्रमाला येत असल्याचा विशेष आनंद आहे असंही कटियार यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अयोध्या दौऱ्यावरुन काही लोकं उगच वाद निर्माण करत असल्याचेही कटियार यांनी म्हटलं आहे. राम जन्मभूमीचा प्रश्न सुटला असला तरी मथुरा आणि काशी येथील मंदिरांचा प्रश्न कायम असल्याचेही कटियार यांनी नमूद केलं आहे. “आधी काशीचा प्रश्न निकाली काढायाची की मथुरेचा यासंदर्भात आम्ही सर्वजण एकत्र बसून विचार करु. माझा जन्मच अयोध्या, काशी आणि मथुरेसाठी झाला आहे. मी आंदोलनांमध्ये सहभागी झाल्याने तुरुंगातही जाऊन आलोय. मात्र आम्ही कधीच वाकलो नाही आणि घाबरलो नाही,” असं कटियार यांनी म्हटलं आहे.

 “मात्र त्यासाठी बराच काळ लागेल”

काही दिवसांपूर्वी ‘आऊटलूक’ला दिलेल्या मुलाखतीमध्येही कटियार यांनी काशी आणि मथुरेतील मंदिरांसंदर्भातील विषयावर भाष्य केलं होतं. “काशी आणि मथुरा येथील मंदिर हे आमच्या अजेंड्याचा भाग नक्कीच आहे. मात्र त्यासाठी बराच काळ लागेल,” असं कटियार म्हणाले होते. तर भाजपाच्या अनेक नेत्यांबरोबर विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी अयोध्येत राम मंदिर बांधण्याला प्रथम प्राधान्य असेल असं मत व्यक्त केल्यासंदर्भात प्रश्न कटियार यांनी विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना, “पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजन झाल्यानंतर मंदिराच्या बांधकामाला वेग येईल. सध्यातरी राम मंदिराच्या बांधकामापेक्षा इतर कोणत्याही गोष्टींना विशेष प्राधान्य दिलं जात असल्याचं मला वाटतं नाही. अयोध्येमध्ये शिलापूजन झाल्यानंतर आम्ही काशी आणि मथुरेचा विचार करु,” असं कटियार म्हणाले.

“भाजपाने राम मंदिर आंदोलनाची सुरुवात केली नव्हती. मात्र…”

काशी आणि मथुरा येथील मंदिरांसंदर्भात भाजपाच्या नेत्यांशी चर्चा सुरु असल्याचेही कटियार यांनी स्पष्ट केलं आहे. “काशी, मथुरा आणि अयोध्येमधील मंदिरांची आमची मागणी होती. काशी विश्वनाथ मंदिर, मथुरेमधील कृष्ण जन्मभूमी मंदिराच्या वादग्रस्त जागेवर तोडगा काढण्याची आमची मागणी होती. आता अयोध्या मिशन पूर्ण झालं आहे तसं काशी आणि मथुराही होईल,” असा विश्वास कटियार यांनी व्यक्त केला आहे.  तसेच “भाजपाने राम मंदिर आंदोलनाची सुरुवात केली नव्हती. मात्र नंतर यासंदर्भातील सहकार्य आणि नेतृत्व पक्षाने नक्कीच केलं,” असंही कटियार म्हणाले आहेत.

काशीमधील ज्ञानव्यापी मशीद आणि मथुरेमधील शाही इधाह या दोन्ही वास्तू धार्मिक स्थळांसंदर्भातील १९९१ च्या कायद्यानुसार संरक्षित वास्तू आहेत, यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता कटियार यांनी ‘असू द्या ना संरक्षित’ असं उत्तर दिलं. “या ठिकाणाहून मशीद हटवावी लागेल. काय होणार आहे ते आपण येणाऱ्या काळामध्ये बघुयात,” असं उत्तर कटियार यांनी आऊटलूकशी बोलताना सांगितले.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती