ठाण्यात राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना कलगीतुरा; कोरोना काळात घरात बसून असल्याचा एकमेकांवर आरोप


विशेष प्रतिनिधी  

ठाणे : पोलिसांच्या बदली प्रकरणावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरुद्ध गृहमंत्री अनिल देशमुख या वादाची धग कायम असतानाच ठाण्यात शिवसेना नेते, मंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांचे कार्यकर्ते भिडले आहेत.

एकनाथ शिंदे ठाण्याचे पालकमंत्री आहेत. गेल्या काही दिवसात ठाण्यातील चिनी विषाणू महामारीने उग्र स्वरुप धारण केले आहे. या अनुषंगाने परांजपे यांनी शिंदे यांच्या कार्यशैलीवरच प्रश्न उपस्थित केला. त्याला सेनेकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले.

“प्रशासन पालकमंत्र्यांची फसवणुक करत आहे. पालकमंत्र्यांनी आता रस्त्यावर उतरावे,” असे विधान परांजपे यांनी केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमाणेच शिंदेसुद्धा संकटकाळात लोकांमध्ये न जाता घरात बसून रहात असल्याची चर्चा ठाण्यात सुरु झाली. त्यामुळे बिथरलेल्या शिवसेनेने ‘राष्ट्रवादी’ला प्रत्युत्तर दिले. “तरुण नेतृत्व म्हणवणाऱ्या ठाण्यातल्या ‘राष्ट्रवादी’च्या नेत्यांचे नखही ठाणेकरांना गेल्या चार महिन्यांच्या काळात दिसलेले नाही,” अशी बोचरी टीका सेनेने जितेंद्र आव्हाड यांचे नाव न घेता केली आहे.

ठाण्याचे महापौर शिवसेनेचे नरेश म्हस्के यांनी परांजपे यांच्यावर टीका करताना म्हटले, “पालकमंत्र्यांनी रस्त्यावर उतरून काम करावे म्हणणारे स्वत: कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून घरात दडी मारून बसले आहेत. पालकमंत्री केवळ रस्त्यावर उतरूनच नव्हे, तर प्रसंगी पीपीई किट घालून कोव्हिड रुग्णालयात जाऊन रुग्णांची चौकशी करत असल्याचे त्यांना माहिती नाही. जे चित्र उभ्या महाराष्ट्राने पाहिले, ते राष्ट्रवादी काँग्रेसचा शहराध्यक्ष म्हणवणाऱ्या व्यक्तीच्या गावीही नसावे, हे दुर्दैवी आहे.”

गेल्याच आठवड्यात कॉंग्रेसचे प्रदेश सदस्य राजेश जाधव यांनीही ठाण्यातील महत्वाच्या प्रश्नासंदर्भात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस विचारात घेत नसल्याची तक्रार केली होती. ‘राष्ट्रवादी’चे परांजपे यांनीही ठाण्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचे हाल होत असल्याचे म्हटले आहे. “मृतदेह बदलण्याचे प्रकार घडत आहेत. या सर्व प्रकाराला शिवसेनेची सत्ता असलेल्या ठाणे महापालिकेचे प्रशासन जबाबदार आहे. परंतु पालकमंत्री थेट रस्त्यावर उतरत नसून ते पूर्णत: प्रशासनावर अवलंबून आहेत,” अशी टीका केली.

राज्याच्या सत्तेत एकत्र असलेल्या ‘राष्ट्रवादी’ने असा घरचा आहेर दिल्यानंतर ठाण्यातील महाविकास आघाडीत पुन्हा एकदा ठिणगी पडली आहे. “पालकमंत्री शिंदे आणि सर्व शिवसैनिक पहिल्या दिवसापासून रस्त्यावर उतरून काम करत आहेत. परंतु, कोरोनाचा उद्रेक झाल्यापासून घरात दडी मारून बसलेल्यांना बाहेर काय चाललंय, याची कशी कल्पना असणार,” असा टोला शिवसेनेने लगावला आहे. “त्यांच्या पक्षाचे ऐंशी वर्षांचे अध्यक्ष प्रसंगी स्वत: रस्त्यावर उतरताना दिसतात, कोरोनाची बाधा झालेले महाराष्ट्रातले अनेक मंत्री व नेते उपचार घेऊन पुन्हा लोकांच्या सेवेसाठी रस्त्यावर उतरले; परंतु तरुण नेतृत्व म्हणवणाऱ्या ठाण्यातल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचे नखही ठाणेकरांना गेल्या चार महिन्यांच्या काळात दिसलेले नाही,” अशी बोचरी टीकाही शिवसेनेने केली आहे

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती