“निडर वाघांनो, आत्महत्या हा पर्याय नाही; आपण लढून जिंकू”

  • संभाजीराजेंचे मराठा तरुणांना भावूक आवाहन

वृत्तसंस्था 

नवी दिल्ली : “निडर वाघांनो, आत्महत्या हा पर्याय असू शकत नाही. आपण लढून जिंकू,” असे खासदार संभाजीराजे भोसले यांनी मराठा तरुणांना आवाहन केले आहे. तुम्हीच जर असे हतबल होऊन आत्मबलिदान देणार असाल, तर मला चांगले वाटणार आहे का?, अशी विचारणाही  त्यांनी केली आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने बीडमधील तरुणाने आत्महत्या केल्याच्या घटनेवर शोक व्यक्त करत संभाजीराजेंनी हे आवाहन केले आहे.

 

संभाजीराजे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “विवेक रहाडे या युवकाने समाजासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. त्याच्या परिवारासोबत आमच्या संवेदना आहेत. घरातील कर्तृत्वाला आलेला युवक असा अकाली जाणे, ही कधीही न भरून निघणारी हानी आहे. मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे. समाजासाठी बलिदान दिलेल्या या मावळ्याला विनम्र श्रध्दांजली”.

 

“माझ्या निडर वाघांनो तुम्हीच जर असे हतबल होऊन आत्मबलिदान देणार असाल, तर मला चांगले वाटणार आहे का? या लढाईतील प्रत्येक मावळा माझ्यासाठी लाखमोलाचा आहे. सर्वांना माझी नम्र विनंती आहे कोणीही असे पर्याय निवडू नयेत,” असं आवाहन यावेळी त्यांनी केलं आहे.

“मराठा आरक्षणाची अटीतटीची लढाई आपण लढत आहोत. कोणत्याही परिस्थितीत हा लढा असाच चालू राहील. आणि मला विश्वास आहे की आपण नक्की जिंकू! हा लढा सुरू असताना, युवकांनी आत्महत्या करू नयेत. आत्महत्या हा पर्याय अजिबात नाही,” असंही ते म्हणाले आहेत.

बीडमधील केतूरा गावातील १८ वर्षीय विवेक रहाडे या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

विवेकची चिठ्ठी

मी विवेक कल्याण रहाडे एक कष्टकरी आणि गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला जीवनात खूप मोठं होण्याची इच्छा आहे. मी आत्ताच नीट परीक्षा दिली आहे. मराठा आरक्षण गेल्याने माझा नंबर लागत नाही. माझ्या घरच्यांची मला प्रायव्हेटमध्ये शिकवण्याचीही ऐपत नाही. त्यामुळे मी माझं आयुष्य संपवत आहे. मी मेल्यानंतर तरी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांना मराठ्यांच्या मुलांची कीव येईल आणि माझे मरण सार्थक होईल…

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*