बैठकीत संभाजीराजेंच्या अवमानानंतर ठाकरे-पवार सरकारला उपरती; सारथीला उद्याच्या उद्या ८ कोटी


  •  संभाजीराजेंच्या प्रमुख मागण्या मान्य; अजित पवारांची माहिती
  •  अजित पवारांच्या दालनात बैठक घ्यावी लागली

विशेष प्रतिनिधी

मुंबई : सारथी संस्थेच्या बाबतीत धोरणात्मक विचका केलेल्या ठाकरे – पवार सरकारला अखेर उपरती झाली आणि खासदार संभाजीराजेंच्या मागण्या पूर्ण करत संस्थेला उद्याच्या उद्या ८ कोटी रूपये देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांना करावी लागली. संभाजीराजेंना निमंत्रण देऊन त्यांना तिसऱ्या रांगेत बसवणाऱ्या अजितदादांना मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांच्या संतप्त प्रतिक्रियांची दखल घेऊन आपल्या दालनात नेऊन संभाजीराजेंना मानाचे स्थान द्यावे लागले.

या सगळ्या वादाच्या प्रकारामुळे महाआघाडी सरकारची पुरती नाचक्की झाली. एवढे होऊनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सर्व वादात कुठेच दिसले नाहीत की त्यांनी संभाजीराजेंना दिलेल्या शब्दाचे काय झाले? हेही समजायला मार्ग नाही. या खेरीज सारथी संस्थेला उद्याच देण्यात येणारे ८ कोटी रूपये विजय वडेट्टीवार यांच्या पुनर्वसन खात्यातून वळते करून घेऊन देण्यात येणार आहेत. या नंतर त्यांच्या खात्यातून सारथी संस्था नियोजन खात्याच्या आखत्यारित आणण्यात येणार आहे.

सारथी संस्थेबाबत खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत महत्त्वपूर्ण निर्णयांची घोषणा केली आहे. संभाजीराजेंनी केलेल्या प्रमुख मागण्या मान्य करत असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

‘सारथीबद्दलची बैठक झाली. वेगवेगळ्या खात्यांचे अधिकारी देखील बैठकीला होते. मागे एकनाथ शिंदे यांनी मागे चर्चा केली होती. कोरोनाचं संकट असताना सारथी काही बंद केली जाणार नाही. वेगवेगळ्या अफवा या दरम्यान आल्या. मात्र सारथीबाबत सरकारची अतिशय सकारात्मक भूमिका आहे. मी माझे सर्वस्व पणाला लावून या संस्थेसाठी काम करणार आहे,’ असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

  •  अजित पवारांच्या घोषणा
  •  सारथी संस्थेची स्वायत्तता टिकवणार
  •  सारथी संस्थेला उद्याच्या उद्या ८ कोटी रुपयांचा निधी दिला जाणार, विजय वडेट्टीवार यांचे खाते ती रक्कम देईल
  •  गेल्या सरकारने ही संस्था आणली पण त्यानंतर काही प्रश्न निर्माण झाले. सीताराम कुंटे यांनी आपला अहवाल १४ दिवसांत द्यायचा आहे
  •  मुख्यमंत्र्यांना विनंती करणार की सारथी नियोजन विभागाच्या अंतर्गत येणार. अण्णासाहेब पाटील महामंडळ नियोजन विभागात आणणार

बैठकीत नाराजीनाट्य

सारथी संस्थेच्या मुद्द्यावरून अजित पवार यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांना बैठकीसाठी निमंत्रित केले होते. मात्र या बैठकीत चांगलाच गोंधळ उडाला. बैठकीदरम्यान संभाजीराजेंना बसण्यासाठी तिसऱ्या रांगेतील खुर्ची दिली गेल्याने मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्वयकांनी आक्रमक भूमिका घेतली.

‘बैठकीवेळी संभाजीराजेंनी मागील खुर्ची देण्यात आली. अजित पवार आणि सरकारने जाणीवपूर्वक संभाजीराजेंचा अवमान केला,’ असा आरोप बैठकीला उपस्थित असलेल्या मराठा क्रांती मोर्च्याच्या इतर समन्वयकांनी केला आहे. त्यामुळे बैठकीत काही काळासाठी तणावाचं वातावरण झाले होते. मात्र नंतर संभाजीराजेंनी संयमाची भूमिका घेतल्याने हा वाद मिटला.

अजित पवारांच्या दालनात पुन्हा बैठक

संभाजीराजेंच्या आसन व्यवस्थेवरून वाद झाल्यानंतर आता बैठकीचे ठिकाण बदलण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात ही बैठक सुरू झाली. यावेळी संभाजीराजेंना अजित पवारांच्या बाजूला बसण्याची व्यवस्था करण्यात आली. बैठकीला संभाजीराजे छत्रपती, अजित पवार, नवाब मलिक, विजय वडेट्टीवार, विनायक मेटे आणि मराठा मोर्च्याचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांचीही या बैठकीला हजेरी होती.

दरम्यान, मराठा समाजाच्या हितासाठी स्थापन झालेल्या संस्थेत संस्थेबाबत जे आंदोलन केलं त्याचा दबाव निर्माण झाल्याने हे निमंत्रण आलं असल्याचं छत्रपती संभाजी यांनी म्हटलेलं होते. यापूर्वी सरकारने जी आश्वासने दिली ती पाळली नव्हती तरी देखील समाजाच्या हितासाठी आपण या चर्चेला जात असल्याचं छत्रपती संभाजी यांनी सांगितले होते.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था